नागपूर (Nagpur) : राज्यात आणि पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना पुणेकरांसाठी आखलेल्या समान पाणीपुरवठा आणि नदी सुधार प्रकल्पाचे (जायका) काम रखडल्याचा मुद्दा भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी निदर्शनास आणून दिला. कामे पुढे का सरकत नाहीत, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे, तसेच ही कामे मुदतीत म्हणजे पुढच्या तीन वर्षांत पूर्ण करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
पुणेकरांना चोवीस तास शुद्ध आणि समान पाणीपुरवठ्यासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांच्या या योजनेचे काम वेगाने होत नसल्याने ती पूर्ण कधी होणार? योजनेतील जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या आणि मीटरची कामे मुदतीत झालेली नाहीत. त्याचवेळी ‘जायका’ प्रकल्प अंमलबजावणीतील अडचणी पूर्णपणे दूर झालेल्या नाहीत. त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार, असा प्रश्न कांबळे यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर समान पाणीपुरवठा आणि जायकाचे काम २०२५ मध्ये पूर्ण होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
प्रशासकाच्या कामावर नाराजी
महापालिकेत गेल्या सहा महिन्यांत प्रशासनाने काढलेले टेंडर, त्याच्या अटी-शर्ती आणि प्रत्यक्षात कामे घेतलेल्या ठेकेदारांची माहिती घेणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. प्रशासनाच्या काळात रस्ते, राडारोडा उचलण्यापासून शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची कामे मर्जीतील ठेकेदारांना दिल्याचा मुद्दा कांबळे यांनी मांडला होता. दरम्यान, प्रशासक काळात महापालिकेचे सुरू असलेले स्थायी समितीचे कामकाज, मुख्य सभेचे कामकाज, दैनंदिन कामकाजाबद्दल बऱ्याच तक्रारी नागरिकांनी तक्रार केल्याने त्याबाबत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिका आयुक्तांना सुनील कांबळे यांनी पत्र देऊन माहिती मागवली होती. पण प्रशासनाने ही माहिती दिली नाही. त्यामुळे कांबळे यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये पुणे महानगरपालिकेच्या कारभाराविषयी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले.