पुणे (Pune) : पुणे विद्यापीठ चौकातील (Pune University Chowk) दुमजली उड्डाणपुलाचे (Flyover) काम ६ ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे आदेश पुणे महानगर परिवहन प्राधिकरणाचे (पुमटा - PMTA) अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao) यांनी गुरुवारी दिले. विद्यापीठ चौकासह चांदणी चौकातील (Chandani Chowk) वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पाच दिवसांत अहवाल तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचेही या बैठकीत ठरले.
राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोसह दुमजली पुलाचे कामाला पीएमआरडीएने सुरूवात केली आहे. त्यासाठी एप्रिल २०२४ पर्यंत गणेशखिंड रस्त्यावर ११ मीटर रुंदीचे बॅरिकेडींग करून पुलाचा पायाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले. दरम्यान, विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलाचे काम नोव्हेंबर ऐवजी जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी करून त्यासाठी विविध उपाययोजना आमदार शिरोळे यांनी सुचविल्या. तसेच दुमजली उड्डाणपुलाचे काम कमी कालवधीत मार्गी लावण्यासाठी काय उपयोजना करता येईल, यासंदर्भातील स्वतंत्र अहवाल तयार करण्याच्या सूचना यावेळा देण्यात आल्या.
गणेशखिंड रस्त्यालगत फुटपाथची रुंदी कमी करणे, पुणे विद्यापीठ ते वैकुंठ मेहता संस्था दरम्यान तात्पुरता रस्ता करणे व या रस्त्याने पुढे रेव्हेन्यू कॉलनी येथे रॅम्प करून वाहतूक वळविणे, खडकी स्टेशन व परिसरातील रस्ते दुरुस्ती करणे, मॉडर्न कॉलेजलगत पाणीपुरवठा वाहिनीचे काम तत्काळ पूर्ण करण्याबाबत सूचना महापालिकेला देण्यात आल्या. गणेशखिंड रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी एनआयसीची जागा ताब्यात घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर बैठक आयोजित करून निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- दुमजली पुलाचे काम नोव्हेंबरऐवजी जानेवारी २०२४ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन
- आधुनिक तंत्रज्ञान व मनुष्यबळ वाढवून कमी कालावधीत काम पूर्ण करणार
- वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यावर अतिरिक्त ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्त होणार
- चतुःश्रृंगी पोलिस चौकीचे गेट उघडून विद्यापीठामार्गे वाहतूक वळविण्यात येणार
- मॉडर्न महाविद्यालयाजवळील रस्त्याचे काम काम करून त्यामार्गे वाहतूक वळविणार