पुणे (Pune) : कोथरूड (Kothrud), कर्वेनगर (Karve Nagar), सिंहगड रस्ता (Sinhgad Road) ते सेनापती बापट (Senapati Bapat) रस्त्यावर ये-जा करण्यासाठी विधी महाविद्यालय रस्त्याचा (Law Collage Road) एकमेव पर्याय आहे. त्यामुळे ही कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या बालभारती ते पौड रस्ता (Balbharti To Paud Road) करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
बहुप्रतिक्षित बालभारती ते पौड रस्ता प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागा पाहणी करून येथील झोपडपट्टीचे पुनर्वसन, टेकडीवरील रस्ता कसा असावा यावर चर्चा केली. दरम्यान, सल्लागाराने तीन पर्याय दिले होते, त्यापैकी उन्नत मार्ग (इलिव्हेटेड) आणि जमिनीवरील रस्ता असा संमिश्र रस्त्याचा पर्याय आयुक्तांनी समोर आणला आहे.
या रस्त्याचा आराखडा सल्लागाराने सादर केला आहे. मंगळवारी अंदाज समितीच्या समितीच्या बैठकीत त्याचे सादरीकरण झाले. त्यानंतर आयुक्तांनी प्रत्यक्ष जागा पाहणी करून निर्णय घेऊयात असे बैठकीत सांगितले. त्यानुसार आयुक्त कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभाग प्रमख व्ही. जी. कुलकर्णी यांनी पाहणी केली.
हे आहेत पर्याय...
पर्याय एक ः बालभारती ते पौड रस्ता हा थेट जमिनीवरून रस्ता करावा. पाण्याचे प्रवाह अडणार नाहीत याची काळजी घ्यावी. पण टेकडीवर फिरायला जाणाऱ्या नागरिकांना अडथळा होणार, या रस्त्यासाठी ८५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.
पर्याय दोन ः १.८ किलोमीटरचा रस्ता मेट्रोप्रमाणे उन्नत मार्ग करावा. त्यामुळे फिरायला येणाऱ्या नागरिकांना अडथळा होणार नाही. या मार्गासाठी १७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.
पर्याय तीन ः टेकडीच्या खालून बोगदा करता येईल. पण यासाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च आहे.
पर्याय चार ः सल्लागाराने तीन पर्याय दिले, पण आयुक्तांनी संमिश्र रस्त्याचा चौथा पर्याय समोर आणला आहे. केळेवाडी, ‘एआरएआय पर्यंत साधा रस्ता करावा व ज्या ठिकाणी जंगल सुरू होते तेथे इलोव्हेटेड रस्ता करावा. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. या पर्यायावर पुढील बैठकीत शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे.
आयुक्त व इतर अधिकारी पौड रस्ता येथून ‘एआरएआय’पर्यंत गाड्यांनी वर गेले. त्यानंतर पुढे पाय वाटेने बालभारतीकडे जाता येते का, असे आयुक्तांनी विचारले. त्यावर होकारार्थी उत्तर मिळताच सर्व अधिकारी सल्लागाराने रस्ता कसा आखला आहे, याची पाहणी करत बालभारतीपर्यंत गेले.
बालभारती ते पौड रस्ता हा वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या रस्त्याची चालत जाऊन पाहणी केली. संपूर्ण इलेव्हेटेड मार्ग न करता काही ठिकाणी जमिनीवर व काही ठिकाणी इलेव्हेटेड रस्ता करावा अशी चर्चा करण्यात आली. या रस्त्यात झोपड्या असल्याने त्यांच्या पुनर्वसनासाठी एसआएची बैठक आयोजित केली आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका