पुणे (Pune) : Pune - Satara Road पुणे-सातारा रस्त्याची (जुना कात्रज घाट रस्ता) मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) सदरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर एकेरी वाहतूक करण्यात आली असून साताऱ्याकडून कात्रज चौकामार्गे पुणे शहरात येणाऱ्या वाहतुकीला बंदी करण्यात आली. याबबातचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे साताऱ्याहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना जुन्या कात्रज घाटाऐवजी नवीन बोगद्यातून दरीपूलमार्गे प्रवास करावा लागणार आहे.
सदर रस्त्यावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असून, सातारा ते पुणे ही वाहतूक जुन्या कात्रज घाटाच्या ऐवजी नवीन बोगद्यातून दरीपूलामार्गे पुण्याकडे वळविण्यात आल्याची माहिती सदर आदेशान्वये देण्यात आली आहे. सदरचा आदेश तीन डिसेंबर २०२२ पासून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत लागू राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
कात्रज घाट रस्त्यांवर दुहेरी वाहतूक चालू असताना डांबरीकरणाचे काम करणे जिकिरीचे होत होते. त्याचबरोबर, अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने आम्ही एकेरी वाहतूक करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार ही एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.
- देवेन मोरे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग