पुणे (Pune) : पुणे स्टेशनवरून लोकलच्या वाहतुकीला डिसेंबरअखेर ब्रेक लागणार आहे. येथील यार्ड रिमॉडेलिंगच्या कामांमुळे ७० टक्के लोकलची वाहतूक ही शिवाजीनगर स्टेशनच्या लोकल टर्मिनलहून केली जाणार आहे.
सुमारे १५ लोकलची (३० फेऱ्या) वाहतूक शिवाजीनगर स्टेशनवरून होईल. यासाठी शिवाजीनगर स्टेशनवर लोकलसाठी नवे टर्मिनल बांधण्याचे काम ‘फास्ट ट्रॅकवर’ सुरू आहे. यासाठीचे ‘ओएचई’चे मास्ट हेडसह ट्रॅकसाठी आवश्यक असलेले ‘अर्थओव्हर’चे काम पूर्ण झाले आहे. नवीन फलाट व नवी लाइन (ट्रॅक) टाकण्यात येत आहे. त्यासाठीचे स्लीपर व रूळदेखील स्टेशनवर दाखल झाले असून, परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांना घरे खाली करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत.
पुणे स्टेशनवरचा लोकलचा भार हलका करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर स्टेशनवर ईएमयू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट अर्थात लोकल) टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी नवीन ३३० मीटर लांबीचे नवीन फलाट तयार करण्याचे काम सुरू आहे. येथून १५ डब्यांची लोकल सुटेल. हे टर्मिनल सुरू झाल्यावर लोणावळ्याला जाणाऱ्या सुमारे पंधरा लोकल शिवाजीनगर स्टेशनवरून सुटतील. परिणामी, पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या लोकलची संख्या कमी होईल. केवळ ज्या लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो, त्याच लोकल पुणे स्टेशनवरून सुटतील. यामध्ये दुपारी पाचला पुण्याला पोहोचणाऱ्या लोकलचा समावेश आहे.
पुणे स्टेशनवरचा भार कमी व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासन विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. हडपसर टर्मिनल, खडकी टर्मिनल यासह शिवाजीनगर स्टेशवरचे ‘ईएमयू’ (लोकल) टर्मिनलदेखील याचाच भाग आहे. नव्या फलाटामुळे लोकलसाठी स्वतंत्र लाईन तयार होईल. त्यामुळे एक प्रकारच्या स्टॅब्लिंग लाइनसारखा त्याचा वापर होईल. परिणामी, शिवाजीनगरवरचा फलाट एक व दोन हा मेल एक्स्प्रेससाठी मोकळा राहील.
शिवाजीनगर स्टेशनवर लोकल टर्मिनलचे काम वेगाने सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबरअखेरीस हे काम पूर्ण होऊन लोकल धावण्यास सुरुवात होईल.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे