पुणे (Pune) : आतरराष्ट्रीय दर्जाचा आयटी पार्क असलेल्या हिंजवडीतील (Hijewadi) प्रमुख रस्त्ये अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. या रस्त्यांवर लहान-मोठ्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात आतिक्रम केले आहे. या अतिक्रमणांवर हिंजवडी ग्रामपंचायतीकडून रविवारी हातोडा चालविण्यात आला. या व्यवसायिकांना हिंजवडी ग्रामपंचायतीने तयार केलेल्या नव्या मंडईमध्ये हलविण्यात आले आहे. परिणामी अनेक वर्षांनी हिंजवडीतील रस्ते मोकळे झाले.
नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ‘आयटी’तील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण करून, रस्ता गिळंकृत करणाऱ्या व वाहतूक समस्येत भर घालणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर कारवाई का केली जात नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला होता. खडबडून जागे झालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने रविवारच्या आठवडे बाजाराचा मुहूर्त साधून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. या कारवाईचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असतानाच प्रशासनाने ही लोकाभिमुख कामांची तत्परता कायम दाखवावी, सातत्य ठेवावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.
हिंजवडी पोलिस, वाहतूक पोलिस, ग्रामपंचायत कर्मचारी, लिपिक यांच्या मदतीने तात्पुरता स्वच्छता कर आकारून, व्यावसायिकांना मंडई आवारात शिफ्ट करण्यात आले. उद्धट वर्तन करणाऱ्या व्यवसायिकांना हटविण्यासाठी हिंजवडी पोलिसांची मदत घेण्यात आली होती. त्यावेळी किरकोळ वाद वगळता आपत्तीजनक प्रकार घडला नाहीत.