पुणे (Pune) : कात्रज-कोंढवा रस्त्यावर मागील ४ वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला असून, ३६ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांकडे नोंद झाल्या अपघातांतील ही आकडेवारी आहे. यात इतर किरकोळ अपघाताच्या आकडेवारीचा समावेश नाही. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. (Accidents On Katraj-Kondhwa Road)
कात्रज-कोंढवा रस्त्यांवरील कात्रज चौक ते गोकुळनगर चौकापर्यंत भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनची हद्द येते. तर, गोकुळनगर चौक ते खडीमशीन चौकांपर्यंत कोंढवा पोलिसांची हद्द येत आहे. रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरवस्थेमुळे मागील चार वर्षांत कात्रज-कोंढवा रस्ता जणू ‘मृत्यूचा सापळाच’ बनला आहे. प्रवाशांसाठी या रस्त्यावरील प्रवास जीवघेणा झाला आहे. २०१८ मध्ये रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचे भूमीपूजन झाल्यापासून कात्रज ते खडीमशीन चौक या साडेतीन किलोमीटरच्या मार्गात जवळपास ५० अपघात झाले आहेत. गेल्या चार वर्षांतील या अपघातात १७ मृतांचा तर ३६ गंभीर जखमींचा समावेश आहे. भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलिस ठाण्यात या अपघातांची नोंद आहे.
२०२० साली कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे काही प्रमाणात अपघातांची संख्या घटल्याचे कात्रज-कोंढवा रस्त्यांवरही पाहायला मिळाले. परंतु, २०२१ मध्ये टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर रस्त्यांवरील रहदारी वाढून झाल्यावर अपघाताच्या संख्येचा आलेख पुन्हा वाढू लागला आहे. नुकताच कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत टिळेकरनगर स्मशानभूमीशेजारील नाल्यालगत झालेल्या अपघात एकाचा मृत्यू झाला होता. सद्यस्थितीत रस्त्यावरून एका तासाला साधारणतः ७ ते ८ हजार वाहनांची वाहतूक होते. यामध्ये अवजड वाहनाचे प्रमाण लक्षणीय आहे. अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसून येते.