पुणे (Pune) : पीएमपीच्या ठेकेदारांच्या ई-बसच्या बॅटरीचा परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे. बॅटरीची कार्यक्षमता लवकर संपत असल्याने बस प्रवासातच बंद पडते. तर दुसरीकडे त्यांना चार्ज होण्यासाठी देखील जास्तीचा वेळ लागत आहे. एक बस चार्ज होण्यासाठी किमान चार तासांचा वेळ लागणे अपेक्षित आहे. मात्र ठेकेदारांच्या बसला किमान सात ते आठ तासांचा वेळ लागतो. त्यामुळे पीएमपीच्या विजेचा वापर वाढला आहेच शिवाय बस डेपोतच जास्त वेळ थांबून राहिल्याने फेऱ्यांच्या संख्येतही घट होत आहे. बसची बॅटरी ७ वर्षांनी बदलणे अपेक्षित आहे. मात्र ठेकेदारांच्या बसची बॅटरी अवघ्या चार वर्षांतच निकामी होत आहे. या सर्वांचा परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे.
पीएमपी बसच्या ब्रेकडाउनचे प्रमाण घटते आहे. मात्र ई-बसच्या बॅटरीचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. बॅटरीचे आयुर्मान अवघ्या चार वर्षांतच संपत असल्याने प्रवासी सेवा खंडित होत आहे. ब्रेकडाउनमध्ये बॅटरीची कार्यक्षमता घटणे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. त्याचप्रमाणे टायर पंक्चर होण्यामुळे देखील प्रवासी सेवा बाधित होत आहे.
पीएमपीचे आर्थिक नुकसान
पीएमपीच्या व ठेकेदारांच्या दोघांच्या ई-बसना पीएमपीच्या डेपोमध्येच चार्जिंग केले जाते. रात्रीच्या वेळी विजेचा युनिट दर कमी आकारला जातो. तसेच रात्री पीएमपीची सेवा बंद असते. त्यामुळे ई-बसचे चार्जिंग रात्रीच केले जाते. मात्र, ठेकेदारांच्या बसला जास्तीचा वेळ लागत असल्याने सकाळी आठ ते नऊपर्यंत देखील बसचे चार्जिंग सुरुच असते. सकाळी विजेचा दर वेगळा असतो, त्यामुळे पीएमपीला जास्तीच्या वीजबिलाचा भुर्दंड सहन करावा लागतो.
बस डेपोतच
पहाटेपासूनच पीएमपीची बस सेवा सुरू होते. मात्र बॅटरी चार्जिंगच्या नावाखाली अनेक बस डेपोतच थांबून राहतात. परिणामी, सकाळच्या सत्रात प्रवासी संख्या जास्त असताना देखील बसची संख्या काही मार्गांवर वेळापत्रकाच्या तुलनेत कमी राहते. याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे.