पुणे (Pune) : बालगंधर्व रंगमंदिराचा (Balgandharva Rangamandir) पुनर्विकास करताना मुंबईतील बीकेसीमधील (BKC) जिओ मॉलची (Geo Mall) पाहणी शुक्रवारी (ता. १३) महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली. नवे बालगंधर्व अधिक देखणे व अत्याधुनिक यंत्रणेसह सुसज्ज असावे, यासाठी या मॉलमधील कलादालन, नाट्यगृहाची पाहणी केली आहे. बालगंधर्वच्या पुनर्विकासाचा अंतिम आराखडा तयार करताना त्यानुसार त्यात बदल केले जाणार आहेत.
बालगंधर्वच्या पुनर्विकासासाठी २०१८ पासून चर्चा सुरू झाली आहे. पण, कोरोनामुळे दोन वर्ष वाया गेली. महापालिकेने यासंदर्भात महालिकेचे पदाधिकारी, अधिकारी कलाक्षेत्रातील तज्ज्ञ, कलाकार यांची समिती गठित केली होती. या समितीने चर्चा करून २४ पैकी एक प्रस्ताव अंतिम केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेल्या आठवड्यात बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास आराखड्याचे सादरीकरण केले. त्यावेळी अजित पवार यांनी बालगंधर्व हे अत्यंत देखणे व कलाकारांना उत्तम सुविधा दिल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी मुंबईतील बीकेसीमधील जिओ मॉलची पाहणी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता.१३) आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे व आर्किटेक्ट सतीश कदम यांनी जिओ मॉलची पाहणी केली.
प्रशांत वाघमारे म्हणाले, ‘‘जिओ मॉलची उभारणी अत्यंत अत्याधुनिक व आकर्षक केली आहे. या तीन मजली मॉलमध्ये प्रत्येक मजल्यावर सुमारे एक लाख ३० हजार चौरस फुटाचे बांधकाम केले आहे. पहिल्या मजल्यावर प्रदर्शनासाठी कलादालन आहेत, दुसऱ्या मजल्यावर छोटे सभागृह आहेत. तर तिसऱ्या मजल्यावर दोन सभागृह आहेत. त्यात मोठे सभागृह एक लाख चौरस फुटाचे आहे, त्याची क्षमता सुमारे दोन हजार आसनांची आहे. दुसरे सभागृह ३० हजार चौरस फुटाचे आहे. बालगंधर्वचा पुनर्विकास करताना तेथील दर्जा प्रमाणे अत्याधुनिक व सुंदर काम करता येणे शक्य आहे.’’
सर्वांना सोबत घेऊन नाट्यगृहाचे काम
बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास सर्व घटकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला गेला आहे. काम सुरू झाल्यानंतर अडीच वर्षात नाट्यगृहाचे काम पूर्ण होईल. शहरातील इतर नाट्यगृहांमध्येही सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बालगंधर्वचा पुनर्विकास करताना तेथे व्यापारी संकुल बांधले जाणार नाही. काही जण हे व्यापारी संकुल असेल, अशा अपप्रचार करत आहेत पण त्यात तथ्य नाही, असा दावा माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत केला.