Pune News पुणे : पालखी मार्गावरील तळाला लागून असलेल्या जागा वारीसाठी कायमस्वरूपी ताब्यात घेऊन त्याचा विकास करण्याबाबत प्रस्ताव तयार करा, अशा जागांवर अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्या. त्यासाठी सरकारतर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी (ता. १४) पुण्यात झालेल्या बैठकीत दिले.
आषाढी वारीसाठी जाणाऱ्या पालखी सोहळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यास आमदार दिलीप मोहिते, संजय जगताप, दत्तात्रेय भरणे, समाधान आवताडे, बबन शिंदे, संजय शिंदे, सुनील कांबळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले,
पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, योगी निरंजननाथ, राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे, पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्यासह अन्य पालखी सोहळ्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. पवार यांच्या हस्ते सुविधांची माहिती देण्यासाठी तयार केलेल्या ॲपचे लोकार्पण केले.
अजित पवार म्हणाले, ‘‘पालखी मार्गावरील कायमस्वरूपी सुविधेच्या दृष्टीने विभागीय आयुक्तांकडे बैठकीचे आयोजन करण्यात येईल. अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या पालखी सोहळ्यांसाठी सुरक्षा आणि अन्य व्यवस्था देण्याबाबत राज्यस्तरावरून सूचना देण्यात येतील. वारी दरम्यान दुर्घटना घडल्यास सरकारतर्फे आर्थिक सहकार्य करण्यात येईल.’’
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे म्हणाले, ‘‘जेजुरी पालखी तळाची कामे सुरू केली आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी एक हजार आठशे, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी एक हजार दोनशे आणि संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी २५० स्वच्छतागृहांची सुविधा देण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी दोनशे पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली असून, ४५ ठिकाणी पाणी भरण्याची सुविधा असणार आहे.
सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यात तीन हजारांपेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मोबाईल टॉवरच्या नेटवर्कची क्षमता वाढविण्यात येणार आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार दर्शन बारीमधील प्रत्येक वारकऱ्याला एक लिटर पाण्याची बाटली व लिंबू पाणी देण्याचे नियोजन केले आहे, असेही दिवसे यांनी सांगितले. या वेळी देवस्थानांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या.