पुणे (Pune) : मोठे औद्योगिकीकरण झालेल्या चाकण (Chakan) परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चाकणच्या प्रस्तावित बाह्यवळण मार्गाची हद्द निश्चिती आठवडाभरात होणार आहे. रासे फाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी हा मार्ग प्रस्तावित केला आहे, असे पीएमआरडीएचे क्षेत्रीय अभियंता जितेंद्र पगार यांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील जमिनींचे भाव कोटींच्या घरात जाऊन जमीनधारकांना सुगीचे दिवस येणार आहेत.
गेल्या तीस वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या जुन्या 36 मीटर रुंदीच्या या बाह्यवळण रस्त्याची प्राथमिक पाहणी पीएमआरडीएचे अधिकारी, वाहतूक विभागाचे उपायुक्त आनंद भोईटे यांनी केल्यानंतर कामाला गती येत आहे. हा मार्ग लवकर व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. रासेफाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी बंगला वस्ती हा सुमारे तीन किलोमीटर अंतराचा बाह्यवळण मार्ग आहे. तो 36 मीटर रुंदीचा चार पदरी मार्ग आहे. दोन्ही बाजूला दोन लेन राहणार असून, मध्यभागी दुभाजक होणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी चौक करण्यात येणार आहेत.
या बाह्यवळण मार्गात जाणाऱ्या बहुतांश जमिनी या शेतकऱ्यांच्या आहेत. त्यांचे संपादन करताना शेतकऱ्यांना तसेच इतरांना एफएसआय देण्यात येणार आहे. या जमिनींचे संपादन झाल्यानंतर या मार्गाच्या कामाला सुरूवात होणार आहे. यासाठी एजन्सीची नेमणूक केल्यानंतर ही एजन्सी मार्गाच्या हद्द निश्चिती व इतर कामे करणार आहे. शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन मार्गाचे काम मार्गी लागणार आहे.
वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले की, चाकण शहरातील व पुणे नाशिक महामार्ग,चाकण- शिक्रापूर, चाकण -तळेगाव रस्ता या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चाकणचा हा बाह्यवळण मार्ग महत्त्वाचा आहे. बाह्यवळण मार्ग लवकर व्हावा यासाठी आम्ही पीएमआरडीएच्या आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांना भेटून या मार्गाबाबतची वस्तुस्थिती सांगितली आहे.
पुणे-नाशिक महामार्गापासून सीएनजी पंप ते सॅनी इंडिया कंपनी असा दुसरा अंदाजे १.५ किलोमीटर लांबीचा आणि पंधरा मीटर रुंदीचा मार्ग होणार आहे. या मार्गाचे काम पीएमआरडीए करणार आहे. या मार्गामुळे पुणे-नाशिक महामार्गवरील वाहतूक आळंदी फाटा येथे न जाता औद्योगिक वसाहतीत महाळुंग्यातून मुंबईकडे जाणार आहे. औद्योगिक वसाहतीतील वाहतूक या मार्गाने येऊन पुणे-नाशिक महामार्गांवर येऊन चाकण, नाशिक, शिक्रापूर या मार्गाकडे जाणार आहे. हे दोन्ही मार्ग झाल्यास चाकणची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
प्रस्तावित बाह्यवळण मार्गातील रासे फाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी या परिसरात सध्या साधारण ३ ते ५ कोटी रुपयांच्या दरम्यान एकरी जमिनींचे भाव आहेत. तसेच प्रतिगुंठा साधारण १२ ते १५ लाखांच्या घरात आहे. मात्र या मार्गामुळे जमीन भाव खाणार असून, एकरी भाव ७ ते ८ कोटींपर्यंत जाणार आहेत. तसेच प्रतिगुंठा १८ ते २० लाखांपर्यंत वधारणार आहे, असे प्लॅाटची विक्री करणार संकेत मेदनकर, राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले. परिसरातील रहिवासी वस्ती तसेच औद्योगिकीकरण, गोदाम व्यवसाय, भाडेतत्त्वावरील खोल्यांना चालना मिळणार आहे.