पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandni Chowk) कोंडी फोडण्यासाठी जुना पूल पाडून त्या जागी नवा पूल उभारण्याचा उपाय शोधण्यात आला खरा मात्र पूल पाडण्याचा मुहूर्त लांबण्याची शक्यता आहे. जूना पूल पाडण्याची पूर्वतयारी म्हणून सुरू असलेली कामे खोळंबल्याने हा उशीर होणार आहे. पूल पाडण्यास आणखी ८ दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी शक्यता आहे.
जुना पूल पाडण्यासाठी या पुलावरील सेवा वाहिन्या काढण्यात येत आहेत. महापालिकेने आपल्या मालकीच्या बहुतेक सर्व सेवा वाहिन्या हलविल्या आहेत. मात्र इतर सेवा वाहिन्या अद्याप हलविण्यात आलेल्या नाहीत. या सेवा वाहिन्या पालिकेनेच हलवाव्यात अशी विनंती करण्यात येत असल्याचे समजते. त्यामुळे सर्व सेवा वाहिन्या हलविण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. दुसरीकडे, जुन्या पुलावरील सर्व सेवा वाहिन्या काढण्यात आल्यानंतरच पुलाच्या पाडकामाला सुरवात करण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) सांगण्यात आले आहे.
सर्व सेवावाहिन्या स्थलांतरित केल्यानंतर पुलाचे पाडकाम सुरू केले जाईल. त्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. पुलाच्या नजिकच्या परिसरात असलेल्यांचे स्थलांतर करावे लागणार आहे, पुलाच्या पाडकामावेळी सुमारे दहा तास वाहतूक थांबवावी लागणार आहे, पूल पाडल्यांतर राडारोडा वेगाने हटवावा लागणार आहे. या सर्व कामांसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि इतर साहित्याचे प्रभावी नियोजन आवश्यक आहे. पाडकामावेळी पावसाचाही अडथळा येऊ शकतो, या सर्व बाबी ध्यानात घेऊन एनएसएआयला नियोजन करावे लागणार आहे.
...अशी फूटणार कोंडी!
चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढील चाळीस वर्षांचा विचार करून महामार्गाची रुंदी वाढविली जात आहे. एनडीए-पाषाण पूल पाडल्यानंतर त्याखालील महामार्ग जवळपास ३६ मीटर रुंदीचा होणार आहे. सध्या या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जाणारी व मुंबईहून पुण्याला येणारी अशा दोन लेन आहेत. रुंदीकरणात मात्र पुण्याहून-मुंबईला जाण्यासाठी ३, तर मुंबईहून पुण्याला येण्यासाठी ३ अशा एकूण सहा लेन तयार होणार आहेत. त्यामुळे पुलाजवळ होणारी वाहतूक कोंडी फुटणार असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे.