पुणे (Pune) : चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याची धडपड सुरू आहे. अनुभव नाही, म्हणून काम मिळत नाही. काही कारणास्तव १० वी, १२ वी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. डिप्लोमा करूनही मनासारखी नोकरी मिळत नाही. तसेच नोकरी करत शिक्षण पूर्ण करायचे आहे. असे असेल तर काळजी करू नका. कारण महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळांतर्गत (एमआयडीसी) जिल्ह्यातील विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी आहेत. ही संधी मिळवून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे (रोजगार कार्यालय) मोफत मार्गदर्शन व नोकरभरती मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे.
नोकरीसाठी १० वी, १२ वी, डिप्लोमा आणि पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले उमेदवार रोजगार कार्यालयात नावनोंदणी करतात. यासोबतच कंपन्यादेखील त्यांची नोंदणी कार्यालयात करतात आणि त्यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळानुसार रिक्तपदांची माहिती देतात. त्यानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करत असलेल्या उमेदवाराला त्या भरतीबाबत माहिती दिली जाते. त्यातून त्या उमेदवाराला नोकरी मिळते. कोरोनामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. त्याचप्रमाणे कंपन्यांनाही मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे वेळोवेळी नोकरभरती मेळावे भरवले जात आहेत. असे रोजगार कार्यालयाच्या सहायक आयुक्त कविता जावळे यांनी सांगितले. तसेच नोकरीची आवश्यकता असलेल्या उमेदवारांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. नवीन कंपन्यांनी रिक्तपदांची माहिती द्यावी, असे आवाहन जावळे यांनी केले.
रोजगारासाठी एकूण नोंदणी
राज्यात : २०,६२,९४६
पुणे जिल्ह्यात : ४,७८,३७०
एप्रिल २०२२पर्यंत कंपन्यांची नोंदणी : १४,७७९
१,१०० पदांसाठी होणार भरती
येत्या काही दिवसांत रांजणगाव, चाकण, शिक्रापूर, कोरेगाव भीमा, सणसवाडी या भागातील औद्योगिक क्षेत्रांतील सुमारे सात कंपन्यांमध्ये एकूण ११०० पदांची भरती होणार आहे. १० वी ते पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे.
या शैक्षणिक पात्रताधारकांना नोकरीच्या संधी
१० वी, १२ वी, आयटीआय, बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी
कोणत्या पदांसाठी
डेटा एन्ट्री ऑपरेटर, अकाउंटंट (हिशेबनीस), सेल्स एक्झिक्युटिव्ह, सीएनसी ऑपरेटर, कॉलिंग, क्लार्क तसेच उपलब्धतेनुसार पदे