Karad : का रखडले 'या' महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम?

Road
RoadTendernama
Published on

कऱ्हाड (Karad) : कऱ्हाड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. त्यात पाटण ते राममळा अवघ्या १३ किलोमीटरच्या पट्ट्यात मार्गाच्या झालेल्या दुरवस्थेने भागातील नागरिक त्रस्त आहेत. अवघ्या १३ किलोमीटरच्या पट्ट्याची दुरुस्ती अथवा नव्याने रस्त्याची उभारणीचे काम पाच वर्षांपासून झालेले नाही. टक्केवारीमुळे काम रखडल्याचा आरोप होत आहे. पाटण ते राममळा काम का रखडले आहे, याचा पाच वर्षांत कोणीच खुलासा केलेला नाही. त्यामुळे तेवढ्या भागाला कोणी वालीच नाही, अशी स्थिती आहे.

Road
CIDCO : सिडकोच्या मेगा हाऊसिंग स्कीमला का मिळतोय उदंड प्रतिसाद?

कऱ्हाड ते चिपळूण महामार्गावरील पाटण ते कोयनानगर रस्त्याच्या कामांचा दर्जा अत्यंत घसरला आहे. निकृष्ट आणि अपूर्ण कामाकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. त्यामुळे पाटण ते राममळा १३ किलोमीटरचा रस्ता म्हणजे खडतर प्रवास अशीच ओळख झाली आहे. रस्त्याचा दर्जा अत्यंत खराब असल्याने वाहने स्लीप होऊन तब्बल वर्षभरात ७५ दुचाकींचा अपघात झाला आहे. मोठ्या अपघाताची संख्या तीसवर आहे. अपघातातील सातत्य पाहावयास मिळते. रखडलेल्या कामासाठी निधी मंजूर झाल्याची चर्चा होते. मात्र, प्रत्यक्षात रस्ता होत नाही.

पाच वर्षांत कोयनेकडे जाणाऱ्या या १३ किलोमीटरवरील रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. त्याचा पावसात टिकाव न लागल्याने एका दृष्टीने त्या खर्चाची उधळपट्टी झाल्यासारखी स्थिती आहे. कोणी आंदोलनाचा इशारा दिला, की तेवढ्यापुरते खड्डे भरण्याचे काम केले जाते. पुन्हा काही दिवसांत त्या रस्त्याला दयनीय स्थितीचा सामना करावा लागतो. दीड वर्षापूर्वी डांबरीकरण झाले; पण तेही टिकले नाही.

Road
Navi Mumbai : 'नैना'तील 5,500 कोटींची कामे ठप्प; शेतकऱ्यांमध्ये का आहे असंतोष?

राष्ट्रीय महामार्गाच्या कऱ्हाड ते पाटण तालुक्यातील कोयना विभागातील राममळा दरम्यानच्या ४८.४ किलोमीटरच्या रस्त्याचे तब्बल २९७ कोटींचे काम एल ॲण्ड टी ठेकेदार कंपनीला देण्यात आले होते. त्या कंपनीने रडतखडत चार वर्षांत ते काम केले. त्यांचे काम कसे तरी पाटणपर्यंत पोचले. त्यानंतर त्या कंपनीने पळ काढला. त्या सगळ्या घोळात पाटणपासून पुढच्या भागाचे काम अपूर्णच राहिले आहे. त्यात १३ किलोमीटरमध्ये मोठी दयनीय स्थिती आहे. रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने झाले आहे. ते काम निकृष्ट झाल्याचा आरोप आहे. कंपनीने काहीही माहिती खुली न करताच ते काम सोडले आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही त्याबाबत अर्धवट माहिती असल्याचे वारंवार स्पष्ट होते.

कऱ्हाड ते चिपळूण रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा सर्वाधिक फटका बसला आहे, तो कोयना विभागाला. पाच वर्षांपासून त्या रस्त्याचे काम रखडल्याने कोयनेकडे प्रवास करणाऱ्यांच्या अक्षरशः अंगावर काटा येतो. ठेकेदार कंपनीने गाशा गुंडाळला असला तरी केंद्र सरकारने पुन्हा अपूर्ण रस्त्याच्या कामासाठी टेंडर काढले होती. त्यासाठीही स्थानिकांना आंदोलनाचा इशारा द्यावा लागला. लवकरच काम सुरू होईल, असेही जाहीर करण्यात आले. मात्र, अद्यापही त्या रस्त्याचे काम सुरू नाही. त्याला कोण जबाबदार? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com