पाटण (Patan) : कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील वीजनिर्मिती केंद्राशी संबंधित उल्लोळ विहीर (सर्जवेल) अस्तरीकरण दुरुस्तीसाठी वीजनिर्मिती बंद ठेवावी लागणार आहे. गळतीचे अन्वेषण झाले आहे. गळती बंद करण्याची उपाययोजना प्रस्तावित असून टेंडर कार्यवाही प्रगतिपथावर असल्याची माहिती कोयना बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव फाळके यांनी पत्रकाद्वारे दिली.
कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील वीजनिर्मितीसाठी जे पाणी कोयना जलाशयातील नवजा येथील टॉवरमधून किंवा हेड रेस टनेलमार्गे निघते. त्या बोगद्याच्या शेवटी एक उल्लोळ विहीर (सर्ज वेल) बांधली आहे. या विहिरीपासून पुढे दाब बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जाते. ही सर्जवेल १९६० ला कातळात १०० मीटर खोल खोदली आहे. या विहिरीस अर्धा मीटर रुंदीचे काँक्रीटचे अस्तरीकरण केले आहे. गेल्या ६० वर्षांत अनेक भूकंपाचे धक्के सहन केलेल्या अस्तरीकरणाला काही ठिकाणी तडेही गेले आहेत. अस्तरीकरणाला तडे गेल्याने सर्जवेलमधून झिरपलेले पाणी इमर्जन्सी टनेल अर्थात आपत्कालीन झडपेद्वारे भुयार यामध्ये जाते. तेथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडते.
सदर झिरपणारे पाणी डोंगर उतारावरून बाहेर पडत असले तरी, वीजगृह, जलाशय किंवा संबंधित डोंगराला कोणताही धोका निर्माण झाला नाही. मात्र, सर्जवेल गळती दुरुस्ती करण्यासाठी गळतीचे अन्वेषण झाले आहे. गळती बंद करण्याची उपाययोजना प्रस्तावित आहे. टेंडर कार्यवाही प्रगतिपथावर आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्जवेल गळती दुरुस्ती करण्यासाठी काही काळ कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील वीजनिर्मिती केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.