सातारा (Satara) : देशभरात नावाजलेल्या व अनेक पुरस्कारप्राप्त सातारा जिल्हा परिषदेत स्वच्छतेच्या ठेक्यावरून मंगळवारी सायंकाळी ठेकेदारांमध्ये मारामारीची घटना घडली होती. टेंडर मागे घेण्यावरून झालेल्या या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या नावलौकिक कामाला गालबोट लागले होते. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी कडक भूमिका घेत संबंधित कामाची टेंडर प्रक्रिया रद्द करून नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या स्वच्छतेच्या टेंडरची प्रक्रिया बांधकाम विभाग उत्तरकडून राबविण्यात आली होती. या टेंडरवरून काल दोन ठेकेदार व त्यांच्या समर्थकांमध्ये वादावादी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची गंभीर दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी टेंडरची प्रक्रिया रद्द करून नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्याच्या निर्णय बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, मंगळवारी जिल्हा परिषदेचे दोन ठेकेदार व त्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादावादीनंतर बुधवारी जिल्हा परिषदेत या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती. जिल्हा परिषदेत विशेषत: बांधकाम विभाग उत्तरमध्ये ठेकेदारांचा वावर जास्त असल्याने या ठिकाणी वारंवार गर्दी होत असून, वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. या विभागात ठेकेदारांची मक्तेदारी दिसून येत असून, प्रशासनाचा कसलाही धाक नसल्याने अशा घटना घडत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या आधी जिल्हा परिषदेत मारहाणीचे प्रकार घडले नसून गेल्या काही दिवसांत ठेकेदार अधिकारी व कर्मचाऱ्यांशीही हुज्जत घालायला कमी पडणार नाहीत. जिल्हा परिषदेचे सीईओ व अधिकाऱ्यांनी ठेकेदारांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी कडक भूमिका घेतली पाहिजे, असे मत कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.