सोलापूर (Solapur) : सोलापूरसह पुणे, अहमदनगर, धाराशिव अशा शहर- जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात २०१९ मधील सर्व्हेनुसार १४ टीएमसी गाळ आहे. त्यात अंदाजे पावणेतीन कोटी ब्रास वाळू आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ११७.२८ टीएमसी असून त्यात १४ टीएमसीहून जास्त गाळ असल्याची सद्य:स्थिती आहे. राज्यातील कोकण विभाग सोडून अन्य विभागांमधील पाच प्रमुख धरणांमधील गाळ काढण्यासंदर्भातील टेंडरची कार्यवाही आता गतिमान केली जात आहे. नागपूर विभागातील गोसीखुर्द, छत्रपती संभाजी नगर विभागातील मुळा व जायकवाडी, जळगाव विभागातील गिरणा आणि पश्चिम महाराष्ट्रातील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील उजनी धरणातील गाळ काढण्यात येणार आहे.
उजनी धरणाची साठवण क्षमता ११७.२८ टीएमसी आहे, पण पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरलेले धरण दरवर्षी उन्हाळ्यात उणे होते. त्यासाठी धरणातील १४ टीएमसीपेक्षा जास्त असलेला गाळ देखील कारणीभूत आहे. तो गाळ काढण्यासाठी २०१९ मध्ये सर्व्हे झाला, पण त्यानंतर विविध टप्प्यांवर गाळ काढण्याची कार्यवाही थांबली होती. आता प्रारूप टेंडर समितीने अहवाल तयार केला असून, त्याला कृष्णा खोरे विकास महामंडळाने सहमती देखील दिली आहे. त्यामुळे आता जलसंपदा विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर अंतिम टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
उजनी धरणाची स्थिती
एकूण साठवण क्षमता
११७.२८ टीएमसी
मृत पाणीसाठा
६३.६६ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा
५३.५७ टीएमसी
धरणातील अंदाजे गाळ
१४.५३ टीएमसी
उजनी धरण आठमाही प्रकल्प असून शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार धरणातून खरीप व रब्बीसाठी वेळेवर पाणी सोडले जाते. जिल्ह्यातील विविध उपसा सिंचन योजनांसह इतर पाणीपुरवठा योजनांना धरणाचा आधार आहे. धरणातील गाळ काढल्यास साठवण क्षमता पूर्वीप्रमाणेच वाढेल. गाळ काढण्या संदर्भातील प्रारूप टेंडर समितीच्या अहवालास आम्ही सहमती दर्शविली असून, आता पुढच्या टप्प्यातील कार्यवाही सुरू होईल.
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर
उजनीत तीन कोटी ब्रास वाळू
२०१९ मध्ये झालेल्या सर्व्हेत उजनी धरणात १४ टीएमसी गाळ होता आणि मागील पाच वर्षांत त्यात वाढ झाली आहे. धरणातील गाळात २० टक्के वाळू असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार दोन कोटी ८० लाखांहून अधिक ब्रास वाळू उजनी धरणात आहे. शासनाला यातून प्रतिब्रास साधारणत: ४०० रुपयांप्रमाणे रॉयल्टी मिळणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत त्यासंदर्भातील टेंडर निघण्याची शक्यता आहे.