कोल्हापूर (Kolhapur) : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या (Kolhapur Zilha Parishad) चौथ्या मजल्यासह जुन्या कागलकर हाऊस (Kalgalkar Housr) परिसराच्या सुशोभीकरणास मंजुरी मिळाल्यानंंतर या कामासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातील चौथ्या मजल्याचे काम सुरु झाले असून, मात्र परिसर सुशोभीकरणाच्या कामाचा नारळ कधी फुटणार,अशी विचारणा सदस्य, कर्मचारी व कंत्राटदार (Contractor) विचारू लागले आहेत. कारण जिल्हा परिषदेकडे सुस्थितीतील पार्किंग (Parking) व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच वाहने पार्किंग होऊ लागली आहेत. त्यामुळे अपघात व वादावादीचे प्रमाण वाढले आहे.
जिल्हा परिषदेची तीन मजली इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे विविध विभागांना जागा शोधण्याची वेळ आली आहे. कागलकर हाऊस येथील इमारतीत पाच विभागांची कार्यालये थाटण्यात आली आहेत. मात्र मुख्य इमारतीत ही कार्यालये नसल्याने या कार्यालयांकडे दुर्लक्ष होत आहे. केवळ जलव्यवस्थापन आणि सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभेच्या वेळीच येथील विभागांचा संपर्क येतो. त्यामुळे हे सर्व विभाग मुख्य इमारतीमध्ये यावेत, यासाठी प्रयत्न सुरु होते. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चौथ्या मजल्यास मंजुरी दिली आणि दणक्यात हे काम सुरु झाले. कागलकर हाऊस इमारतीचा विकास हा देखील या कामाचाच एक अविभाज्य भाग आहे.
कागलकर हाऊस परिसर सुशोभीकरण, पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहे, वृक्षारोपण, लॅण्डस्केपिंग आदी कामे केली जाणार आहे. ३ ते ४ कोटी रुपयांची तरतूद या कामांसाठी केली आहे. मात्र अद्यापही हे काम सुरु झालेले नाही. सध्या या इमारतीच्या परिसरात खाचखळगे, धूळ, खडडे असल्याने पार्किंग केलेल्या वाहनांचा रंगच बदलून जात आहे. तसेच पार्किंग अस्ताव्यस्त असल्याने वारंवार वादविवाद होत आहेत. अनेक वाहने मुख्य रस्त्याला लागत असल्याने अपघात होत आहेत. या सर्वावर एकच पर्याय असून त्यासाठी परिसर विकास करणे गरजेचे आहे. मात्र किती अपघात झाल्यानंतर कागलकर हाऊसचा परिसर विकास होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
कागलकर हाऊस येथील परिसर विकास करण्याची लोकप्रतिनिधी आणि कर्मचारयांची मागणी आहे. सध्या पार्किंगची अडचण निर्माण होत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. त्यामुळेच संबंधित कंत्राटदारास परिसर विकासाचा आराखडा सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनीही याबाबत सुचना दिल्या आहेत. सोमवारी एकत्रित पाहणी करुन परिसर सुशोभीकरण कामाला सुरुवात केली जाईल.
- महेंद्र क्षीरसागर, कार्यकारी अभियंता बांधकाम