कोल्हापूर : सातारा ते कागल या महामार्गाच्या सहापदरीकरण कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टेंडर मागविले असून, दोन वर्षात हे काम पूर्ण करण्याची अट टेंडरमध्ये आहे. २२ नोव्हेंबरपर्यंत इच्छुक ठेकेदारांनी हे टेंडर भरायचे असून भरलेली टेंडर २३ नोव्हेंबरला उघडण्यात येणार आहेत.
केवळ जमीन संपादनाचे काम रखडल्याने या कामाला सुरुवात झाली नव्हती. १३२ किलोमीटरचा हा महामार्ग असून, त्यासाठी सुमारे २५० हेक्टर जमीन संपादनाचे काम पूर्ण झाले आहे. आवश्यक जमिनीच्या पटीत जमीन संपादन ९७ टक्के झाले. उर्वरित जमीन संपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन टप्प्यात या कामासाठी टेंडर मागवण्यात आले आहेत. त्यातील एक टेंडर २००८ कोटींची तर दुसरे टेंडर १७१२ कोटी रूपयांची आहे.
सद्या असलेल्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना आणखी पदर तयार करण्यात येणार आहेत. सांगली फाट्यावर पंचगंगेचे पाणी येऊन रस्ता बंद होतो, हे टाळण्यासाठी सांगली फाट्यावर या रस्त्याला १३ ठिकाणी बॉक्स ठेवण्यात येणार आहेत; तर कागल ते सातारा या मार्गावर पंचगंगेचे किंवा अन्य नद्यांचे पाणी ज्याठिकाणी रस्त्यावर येते, अशा १६ ठिकाणीही ‘ओपनिंग’ ठेवले जाणार आहेत. महापूर आल्यावर या महामार्गावरील वाहतूक कोणत्याही परिस्थितीत वाहतूक बंद राहणार नाही, अशी व्यवस्था नवा रस्ता करताना करण्यात येणार आहे.
कोल्हापूरसह सांगली, सातारा अशा तीन जिल्ह्यातून हे काम जाणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते या कामाचा प्राधिनिधिक स्वरूपात उद्घाटन झाले आहे. सातारा जिल्ह्यात ५८ किलोमीटर, कोल्हापूर जिल्ह्यात ४२ तर सांगली जिल्ह्यात ३२ किलोमीटरचे काम होणार आहे. या कामाच्या दोन्हीही टेंडर ७ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द झाले. एका टेंडरसाठीच्या फॉर्मची किंमत दोन लाख १० हजार तर दुसऱ्या फॉर्मसाठी १ लाख ८० हजार फी आहे.
रविवारी मंत्र्यांचा आढावा
या कामाची निविदा प्रसिध्द झाल्यानंतर कामाचे स्वरूप, त्यात येणारे अडथळे, रखडलेले जमीन संपादन याविषयी चर्चा करण्यासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, त्या त्या जिल्ह्यातील इतर मंत्री यांची संयुक्त बैठक येत्या रविवारी (ता. २४) कोल्हापुरात होणार आहे. शासकीय विश्रामगृहावर होणाऱ्या या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित रहाणार आहेत.