कऱ्हाड (Karad) : जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या समाधी परिसरातील संरक्षक भिंतींचे १५ कोटींचे टेंडर (Tender) प्रसिध्द झाले आहे. गॅबीयन पद्धतीने हे काम केले जाणार आहे. राज्य सरकारकडून त्यासाठी निधी उपलब्ध होणार असून, हे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी आज दिली.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी १९९० मध्ये स्मारक बांधले. ते स्मारक कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर आहे. स्मारक परिसरात २००१ पासून जमीन खचण्याची भीती उद्भवू लागली. कोयना व कृष्णा नदीस येणाऱ्या पुरामुळे स्मारकाच्या बाजूच्या जमिनींची धूप होऊ लागली. २००५ व २००६ मध्ये सलग दोन वर्षे आलेल्या पुराचा वेढा समाधी स्मारकास बसला. त्यामुळे त्या भागातील काही जमीनही ढासळली. त्यानंतर जलसंपदा विभागाने प्रस्तावित एक हजार ६०० मीटर लांबीच्या कामापैकी एक हजार १६८ मीटर लांबीच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले.
त्यानंतर नव्याने कृष्णा पुलापर्यंतच्या संरक्षण भिंतीचा विचार पुढे आला. त्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, तत्कालीन व विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या कामाबाबतच्या सूचना दिल्या. त्यानुसार दोन हजार ५६२ मीटर लांबीच्या संरक्षित भिंतींच्या प्रस्तावाची चर्चा सुरू झाली.
सुधारित प्रस्तावानुसार प्रीतिसंगमावरील ज्येष्ठ नेते चव्हाण यांच्या समाधी स्मारकाभोवती संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी निधीचा तुटवडा होता. त्यामुळे ते काम रखडले होते. त्यासाठी यापूर्वी टेंडर निघाले होते. मात्र त्या टेंडरमध्ये कोणीही स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे ते काम पुन्हा रखडले. त्यासंदर्भात 'टेंडरनामा'ने आवाज उठवविला होता. त्याची दखल महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सातारा जिल्ह्याचे बाळासाहेब पाटील हे सहकारमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहात आहेत.
सध्या त्या संरक्षक भिंतीसाठी निधी देण्यासाठीची जुनी मागणी लावून धरण्यात आली. त्यानुसार सध्या त्या संरक्षक भिंतीसाठी निधी मंजूर झाला आहे. त्याची माहिती देताना सहकारमंत्री पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात संरक्षक भिंत बांधण्यासंदर्भात सुचवले होते. या कामाचे नुकतेच १५ कोटी ८६ लाखांचे टेंडर निघाले आहे. त्यामुळे त्या कामाला लवकरच सुरुवात होईल. हे काम गॅबीयन पध्दतीने होणार आहे. त्यामुळे पुरापासून समाधीचे संरक्षण होऊ शकणार आहे.