सातारा (Satara) : जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा सरकारी मेडिकल कॉलेजच्या टेंडरला राज्य सरकारने मुदतवाढ दिली. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टेंडर दाखल करता येणार असल्याने आणखी स्पर्धा वाढणार आहे. आतापर्यंत दहा कंपन्या इच्छुक असून, यात दिल्ली, मुंबई, बंगळूर, गुजरातमधील काही कंपन्यांचा समावेश आहे. इंधनाचे भाव व बांधकाम साहित्याचे दर कमी झाल्याने ४९५ कोटींच्या या टेंडरची रक्कमही कमी होण्याची शक्यता बांधकाम विभागाकडून व्यक्त होत आहे.
सातारा सरकारी मेडिकल कॉलेज सुरू असून, १०० विद्यार्थ्यांची पहिली एमबीबीएसची बॅच शिक्षण घेत आहे. त्यामुळे कॉलेज सुरू होण्याबाबतचा विषय मार्गी लागला तरी कॉलेजच्या नियोजित जागेवर इमारत बांधकामाचा मुद्दा अद्याप बाकी आहे. ४९५ कोटींचा इमारतीचा आराखडा असून, त्याची सध्या टेंडर प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी दहा कंपन्यांनी संपर्क करून टेंडरमध्ये काही बदल करण्याची सूचना केली होती. त्या सूचना लक्षात घेऊन १८ मार्चपर्यंत टेंडर भरण्याची मुदत देण्यात आली होती. या टेंडरसाठी महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, बंगळूर येथील कंपन्या इच्छुक आहेत. आतापर्यंत या दहा कंपन्यांनी टेंडर भरल्याचे सांगितले जाते. पण, या टेंडरला म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याने सरकारने टेंडर भरण्याची मुदत आणखी वाढवली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टेंडर भरता येणार आहे. त्यामुळे आणखी काही मोठ्या कंपन्या या टेंडर प्रक्रियेत सहभागी होतील, असे सांगितले जाते.
साताऱ्यात बारामतीच्या धर्तीवर मेडिकल कॉलेजची सुसज्ज इमारत होणार आहे. त्याचा आराखडा तयार असून वैद्यकीय शिक्षण विभागाने या आराखड्यास मान्यताही दिली आहे. इमारत बांधकामासाठी टेंडर प्रक्रिया झाल्यावर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. सध्या बांधकाम साहित्यासह इंधनाचे दर कमी झाल्याने मेडिकल कॉलेजच्या टेंडरची किंमतही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किंमत कमी झाल्यास आणखी काही कंपन्या या टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दर्जेदार कामासाठी राहणार लक्ष...
सातारा सरकारी मेडिकल कॉलेजच्या सर्व प्रक्रियेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष आहे. मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम चांगल्या कंपनीला करण्याचे टेंडर मिळण्याची शक्यता आहे. टेंडर कोणालाही मिळाले, तरी इमारतीचे काम हे दर्जेदार होण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विशेष लक्ष दिले आहे.