सोलापूर (Solapur) : ‘महावितरण’ने वीजेचे कनेक्शन दिल्यानंतर आता सोलापूर बस डेपोत चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. १० जूनपर्यंत काम पूर्ण करून तत्काळ सोलापूर-पुणे या मार्गावर पहिल्या टप्प्यात १० इलेक्ट्रिक बस धावतील, असे नियोजन विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांनी केले आहे. तसेच राज्यातील विविध डेपोंमध्ये ई-बसचा वापर वाढण्यासाठी ५१५० ई-बसचे टेंडर काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात इलेक्ट्रिक बससेवा सुरु करण्यात येत आहेत. इंधनावरील कोट्यवधींचा खर्च कमी करून व प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरविली जाणार आहे. पुणे-नगर, पुणे-मुंबई यासह इतर काही मार्गांवर सद्य:स्थितीत ७० इलेक्ट्रिक बस धावत आहेत. आता सोलापूर विभागानेही महामंडळाकडे सोलापूरसाठी ७५ इलेक्ट्रिक बसगाड्या द्याव्यात, असा प्रस्ताव महामंडळाकडे पाठविला आहे. पंढरपूर व मंगळवेढ्यासाठी प्रत्येकी २५ तर सोलापूरसाठी २५ बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यात नोंदविण्यात आल्या आहेत. विभाग नियंत्रक भालेराव यांनी त्यासंबंधीची माहिती दिली. सोलापूर डेपोतील चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर पंढरपूर येथील चार्जिंग स्टेशनचे काम सुरु केले जाणार आहे. त्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा, मंगळवेढा-पंढरपूर, पंढरपूर-पुणे, मंगळवेढा-पुणे अशी इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
‘शिवशाही’प्रमाणे असणार तिकीट
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आता पाच हजार १५० इलेक्ट्रिक बसगाड्या येणार आहेत. सध्या १५० बसगाड्या तयार करण्याचे काम सुरु असून त्यातील ७० गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. प्रत्येक विभागात चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना बसगाड्या मिळणार आहेत. या गाड्यांचा तिकीट दर शिवशाही बसप्रमाणेच असणार आहे. बसगाड्यांची गुणवत्ता एकदम दर्जेदार आरामदायी आहे.
लवकरच सुरु होईल इलेक्ट्रिक बससेवा
महावितरणने वीज कनेक्शन दिल्यानंतर आता सोलापूर बस डेपोत चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरु आहे. काही दिवसांत काम पूर्ण होईल, अशी आशा आहे. जून महिन्यात सोलापूर-पुणे इलेक्ट्रिक बससेवा सुरु करण्याचा मानस आहे. महामंडळाकडे सोलापूरसाठी २५ बसगाड्या मागितल्या असून पहिल्यांदा दहा गाड्या धावतील, असे नियोजन आहे. त्यानंतर उर्वरित गाड्यांचे वेळापत्रक निश्चित केले जाईल.
- विनोद भालेराव, विभाग नियंत्रक, सोलापूर