सोलापूर (Solapur) : जिल्ह्यातील जलजीवन मिशन तक्रारी व संशयाच्या फेऱ्यात अडकले होते. बिल वेळेवर मिळत नाही म्हणून ठेकेदार व्यवस्थित काम करत नव्हते, व्यवस्थित काम होत नाही म्हणून बिल वेळेवर मिळत नव्हते. जलजीवन मिशनमधील हे दुष्टचक्र मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी भेदले आहे. कामांमध्ये गुणवत्ता व पारदर्शकता आणल्यानंतर आता ठेकेदारांनी मागणी केल्यानंतर तेराव्या दिवसात त्याच्या खात्यावर बिल जमा करण्याची नवी पध्दत सुरू झाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेत आता देयके देण्याची ही नवीन पध्दत सुरू झाली आहे. ठेकेदाराने देयकाची मागणी केल्यानंतर शाखा अभियंता/उपअभियंता यांनी पाच दिवसांमध्ये मोजमाप घेणे, देयके तयार करणे, उपअभियंता यांची १०० टक्के तपासणी, मोजमाप पुस्तक व देयके प्रत्यक्ष विभागीय कार्यालयास सादर करावी लागणार आहेत. पुढच्या दोन दिवसात शाखा अभियंता यांनी देयके तांत्रिक शाखेकडे प्राप्त झाल्यानंतर शाखा अभियंता यांनी देयक तपासणी करून व शहानिशा करून देयके पारित करण्यासाठी लेखा शाखेकडे पाठवणे आवश्यक आहे. पुढील दोन दिवसात वरिष्ठ सहायक लेखा/सहायक लेखाधिकारी/लेखाधिकारी यांनी देयकाची तपासणी करुन देयके पारित करण्यासाठी पुढील कार्यवाहीस्तव सादर करावीत. त्यानंतर एका दिवसात उपकार्यकारी अभियंता/कार्यकारी अभियंता यांनी देयक तपासणी करून व शहानिशा करून देयक पारित करण्यासाठी मंजुरी देणे आवश्यक आहे.
जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालकांनी पुढील एक दिवसात देयक तपासणी व शहानिशा करून देयक पारित करण्यासाठी शिफारस करणे आवश्यक आहे. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी एका दिवसामध्ये तपासणी, शहानिशा करून देयक पारित करण्यासाठी मंजुरी देणार आहेत. वरिष्ठ सहायक लेखा यांनी वितरण आदेश तयार करणे, सहायक लेखाधिकारी यांनी वितरण आदेश तपासणे व देयक पारित करणे, लेखाधिकारी यांनी वितरण आदेश तपासणी करणे, कार्यकारी अभियंता यांनी वितरण आदेश स्वाक्षरी व अंतिम मंजुरी देणे, वरिष्ठ सहायक लेखा यांनी पीएफएमएस प्रणालीद्वारे निधी वितरित करणे ही प्रक्रिया एका दिवसात पूर्ण करणे आवश्यक आहे. पूर्वीच्या पद्धतीत या प्रक्रियेत विलंब होत होता. हा विलंब टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी जलजीवन मिशनच्या कार्यकारी समिती बैठकीत नवीन प्रक्रियेचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर ही नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे.
जलजीवन मिशनची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्वी अनेक त्रुटी होत्या. प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचे बदल केले जात आहे. या बदलांमुळे जलजीवन मिशनमध्ये सोलापूर जिल्ह्याची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे. ठेकेदारांनी वेळेत व गुणवत्तेचे काम करावे एवढीच आमची अपेक्षा आहे. ठेकेदाराचे काम जर वेळेत आणि गुणवत्तेचे झाले तर त्याला त्याच्या कामाचा मोबदलाही वेळेतच मिळाला पाहिजे. त्यासाठी त्याच्यावर कोणत्याही गोष्टीला बळी पडण्याची वेळ येऊ नये. यासाठी देयके अदा करण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.
- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद