सोलापूर (Solapur) : सोलापूर ते उजनी या समांतर जलवाहिनीचा १०० किलोमीटरचा टप्पा तीन-चार दिवसांत पूर्ण होत आहे. तब्बल १३ वर्षांपासून सोलापूरकरांना तीन-चार दिवसाआड पाणी मिळत आहे. आता समांतर जलवाहिनी पूर्ण झाल्यानंतर सोलापूरकरांना दोन-तीन दिवसाआड पाणी मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीत विरोधकांना त्यावर प्रचाराची संधी मिळू नये म्हणून जलवाहिनीचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनावर राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे.
श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर दोन महिन्यात विमानसेवा सुरू होईल, असे सांगण्यात आले. पण, सव्वा वर्ष होऊनही विमानसेवा सुरू झाली नाही. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसल्याचे पाहायला मिळाले. आता विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने वेगवान हालचाली सुरू आहेत.
दुसरीकडे सोलापूरकरांच्या पाण्याचाही प्रश्न कायमचा निकाली निघावा, यासाठी समांतर जलवाहिनी ऑक्टोबरअखेर पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्रात, राज्यात व महापालिकेत सत्ता असूनही भाजपला सोलापूर शहराचा पाणीप्रश्न सोडविता आला नाही, अशी टीका विरोधकांकडून होत आहे.
या पार्श्वभूमीवर विधानसभा आचारसंहितेपूर्वी सोलापूरकरांना दोन दिवसाआड पाणी मिळावे, यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वरवडे, टेंभुर्णी, उजनी धरणाजवळील आढेगाव व हिवरे या गावाजवळील अडथळे दूर करण्यासाठी राज्य स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.
समांतर जलवाहिनीचा प्रवास
एकूण अंतर
११० किलोमीटर
कामाची किंमत
८९० कोटी
कामाची सुरवात
१ जून २०२३ पासून
आतापर्यंत काम पूर्ण
१०० किमी
दररोज किती पाणी मिळणार
१७० एमएलडी
५० वर्षे टिकतील पाइप
सध्या सोलापूर ते उजनी (११० किमी) समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. या कामासाठी कोटिंग असलेले पाइप वापरले जात आहेत. ते पाइप किमान ५० वर्षे टिकतील, असे आहेत. दुसरीकडे जलवाहिनी मुरमाड भागात टाकली जात असल्याने निश्चितपणे ५० वर्षे तरी काही होणार नाही, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
आठवड्यात दोन व तीन दिवसाआड पाणी
समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर तीन महिने प्रात्यक्षिक होईल. त्यानंतर पाण्याच्या वेळा कमी करून आठवड्यातून दोन व तीन दिवसाआड पाणी दिले जाणार आहे. मात्र, दररोज पाणी मिळण्यासाठी अमृत-२मधील कामे आणि पाकणीतील नवीन पंपहाऊस होण्याची वाट पहावी लागेल.
समांतर जलवाहिनी झाल्यावर जुने पंप बंद करून नवीन पंप टाकून त्याठिकाणी ८० एमएलडी पाणी साठवले जाईल. सोरेगाव पंप हाऊसवर ११० ते १२० एमएलडी साठवले जाईल.
अमृत-२मधील व पाकणीचे पंपहाऊस होईपर्यंत टाकळी व उजनीवरील पाइपलाइनचे पाणी तेथे साठविण्याचे नियोजन आहे. नियमित पाणीपुरवठ्यासाठी सोलापूरकरांना आणखी एक ते दीड वर्षे वाट पहावी लागेल, असेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
समांतर जलवाहिनीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या नेतृत्वाखाली सव्वा वर्षात १०० किमी काम पूर्ण झाले आहे. आता वरवडे, टेंभुर्णी, आढेगाव व हिवरे येथील काम देखील लवकरच पूर्ण होईल. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर शहराचा पाणीपुरवठा आठवड्यातून दोन- तीन दिवसाआड होईल.
- व्यंकटेश चौबे, प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता, सोलापूर महापालिका