सोलापूर (Solapur) : महापालिकेच्या जाहिरात परवाना विभागाने रंगभवन येथील स्मार्ट सिटी अंतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या पब्लिक प्लाझावर जाहिरात करण्यासाठी यापूर्वी काढलेल्या टेंडर प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने आता पुन्हा दुसऱ्यांदा टेंडर काढण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील यांनी दिली.
महापालिकेकडून मुख्य परिसरात विविध प्रकारची जाहिरातबाजी, खुली जागा भाडेतत्वाने देणे यातून महापालिकेचे उत्पन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केलेल्या रंगभवन चौकातील पब्लिक प्लाझा येथील एलईडी 36 इंची पॅनल आणि 112 मीटर लांबीच्या स्क्रोल पट्टीवर जाहिरातीसाठीचे टेंडर काढले होते. हे टेंडर सात वर्षांकरिता होते. परंतु, जाहिरातीसह या परिसराची देखभाल दुरुस्तीदेखील संबंधित जाहिरातदारावर बंधनकारक करण्यात आली होती. त्यामुळे या टेंडर प्रक्रियेला सोलापूरकरांचा प्रतिसाद मिळालेला नाही.
आता दुसऱ्यांदा काढण्यात आलेली टेंडर प्रक्रिया ही केवळ 11 महिन्यांच्या कालावधीसाठी असून दरही कमी करण्यात आले आहेत. 11 महिन्याकरिता साडेतीन लाख रुपये जाहिरातीचे दर जाहीर केले आहेत. तसेच याच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च हा संबंधित ठेकेदारावर देण्यात आला आहे. यासाठी टेंडर दाखल करण्यासाठी सोलापुरातील व्यापाऱ्यांना 14 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या प्रसिद्धीकरणानंतर सोलापुकरांचा प्रतिसाद मिळेल का याकडे प्रशासन आशेने पाहत आहे.