सोलापूर (Solapur) : गेल्या सहा वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या आणि महापालिकेला कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या होर्डिंगकडे आयुक्तांनी लक्ष घातले आहे. शहरातील महापालिकेसह खासगी 131 ठिकाणांचे टेंडर काढण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त विक्रम पाटील यांनी दिली.
महापालिकेचे महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी आयुक्तांनी ई-लिलावावर भर दिला आहे. शहरातील मोकळ्या जागा, शौचालये, मुदत संपलेले गाळे, राजकारण्यांची सभाकेंद्र बनलेल्या अभ्यासिका, समाजमंदिरे ताब्यात घेऊन टेंडर काढले. या टेंडर प्रक्रियेला शहरातील व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. महापालिकेला अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न यातून मिळत आहे.
आता आयुक्तांनी होर्डिंगकडेही लक्ष घातले असून शहरातील खासगी व महापालिकेच्या अशा 131 ठिकाणांची यादी काढली आहे. यामध्ये शहरातील मुख्य चौकातील पथदिवे, दुभाजक, रंगभवन प्लाजा आदी ठिकाणांचा समावेश आहे. प्रतिवर्षी शहरातील होर्डिंगच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळते.
आतापर्यंत महापालिकेने केवळ जागांची यादी बनविण्याचे काम केले. प्रत्यक्ष टेंडर प्रक्रिया राबविली नाही. आता आयुक्तांनी महापालिकेच्या मालकीच्या सर्व जागा ताब्यात घेण्यास सुरवात केली आहे. ताब्यात आलेल्या जागा भाडेतत्वाने देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे महापालिका तिजोरीतील महसुलीत भर पडणार आहे.