सोलापूर (Solapur) : शहरातील पूर्व भाग वगळता इतर मार्ग खासगीकरणासाठी महापालिका प्रशासनाने काढलेल्या टेंडरमध्ये एकही कंपनी, संस्थेने सहभाग घेतला नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांदा टेंडर प्रक्रिया राबविण्यात आल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
महापालिका परिवहन विभागाच्या खासगीकरणासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. शहरातील मुख्य एकूण ७७ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी पूर्वभागात सात प्रवासी मार्ग आहेत. या मार्गांवर महापालिकेच्या बस धावतील. तर उर्वरित शहरातील ७० मार्गांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. सध्या परिवहनच्या तीस बस मार्गावर सुरू आहेत. यातील बहुतांश बस हे ग्रामीण भागातच सुरू आहेत. तर शहरातील विडी घरकुल परिसरातच परिवहनची सेवा सुरू आहे. परिवहन विभागाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी परिवहनचे खासगीकरण करण्यात येणार आहे. शहराच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर दिशांना एकूण महत्त्वाचे ७० मार्गांचे खासगीकरण होणार आहे. बसमार्ग व प्रवास भाडे ठरविण्याचा अधिकार महापालिका स्वत:कडे राखून ठेवणार आहे.
शहरात चालविण्यात येणाऱ्या बस कोणत्या प्रकारच्या असाव्यात, ई-बस की इंधनावर चालणाऱ्या, हे ठरविण्याचे अधिकार मक्तेदाराला आहेत. शहरातील सर्वसामान्य प्रवाशांना चांगल्या दर्जाची प्रवासी सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने खासगीकरण करण्यात येत असून, प्रशासकीय बैठकीत मंजुरी घेऊन मे महिन्यात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये कोणीही सहभाग घेतला नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा ३० दिवससांची निविदा काढण्यात आली. यामध्येही कोणतीही कंपनी अथवा संस्थेने सहभाग नोंदविला नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा टेंडर प्रक्रिया राबविण्यात आल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.