सोलापूर (Solapur) : सोलापुरातील स्मार्ट सिटीबद्दल (Smart City) नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. सोलापुरातील कोणते रस्ते (Road) स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदले आहेत आणि कोणते रस्ते महापालिकेने (Solapur Municipal Corporation) खोदले आहेत? हे समजत नाही. या प्रश्नाचे गांभीर्य आता माझ्या लक्षात आले आहे. स्मार्ट सिटीच्या आणि महापालिकेच्या कारभारात आता मी लक्ष घालणार आहे. पुढच्यावेळी सोलापूरच्या दौऱ्यावर येताना अन्य बैठका घेणार नाही, फक्त स्मार्ट सिटी आणि महापालिका याच विषयावर बैठक घेणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी दिली.
पालकमंत्री भरणे सोलापूरच्या दौऱ्यावर होते. नियोजन भवनात त्यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. पालकमंत्री भरणे म्हणाले, स्मार्ट सिटीच्या संचालकांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत उजनी ते सोलापूर या समांतर जलवाहिनीच्या कामाचा ठेका रद्द झाला. मी देखील सोलापूरचा सेवक आहे. पालकमंत्री म्हणून मला याबाबतची कल्पना तरी द्यायला हवी होती. त्यांनी मला कसलीही कल्पना दिली नाही. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून मी या कामासाठी राज्यस्तरावर मदत करु शकलो असतो. सोलापूरकरांना रोज पाणी देणे, शहर व परिसरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरविणे हे माझे कर्तृव्य आहे. त्यासाठी मी सोलापूरचा पालकमंत्री म्हणून काम करणार, या पुढे स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या कारभारात लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेचे काम देताना त्यामध्ये वाढीव निधीची तरतूद नव्हती. कोरोनामुळे जलवाहिनीचे काम रखडले होते. त्यामुळे ठेकेदाराने वाढीव निधीची मागणी केली. वाढीव निधी देणे शक्य नसल्याने हा मक्ता रद्द करण्यात आल्याची माहिती स्मार्ट सिटीचे सिईओ त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी यावेळी दिली. येत्या पंधरा दिवसात या कामांसाठी नवीन टेंडर काढले जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.