सोलापूर (Solapur) : अमृत योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलत आहे. त्याचबरोबर मालधक्क्यांचे विस्तारीकरण करताना पायाभूत सुविधांही पुरविल्या जाणार आहेत. सोलापूर रेल्वे विभागातील चार मालधक्क्यांसाठी ४२ कोटी मंजूर झाले आहेत. त्यातून बाळे, पंढरपूर, लातूर, भिगवण मालधक्क्यांची स्थिती सुधारणार आहे.
मालवाहतुकीतून रेल्वेला वर्षाकाठी साधारण ६०० कोटींचे उत्पन्न मिळते. त्यामुळे मालवाहतुकीला अधिक गती देण्यासाठी मालधक्क्यांवर पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला. सोलापूर विभागातील चार ठिकाणच्या मालधक्क्यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात पहिल्या टप्प्यात बाळे, पंढरपूर, लातूर, भिगवण या रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.
माल धक्क्याच्या प्लॅटफॉर्मवरील कव्हर शेड वाढविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मालधक्का परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. ॲप्रोच रोड केले जाणार आहे. जेणे करून माल चढविणे आणि उतरविण्यासाठी सोयीचे होणार आहे. त्यामुळे माल धक्क्यांवर येणाऱ्या वाहनांची सोय होणार आहे.
त्याचबरोबर हमालरुम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाणिज्य कार्यालय या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी रेल्वे बोर्डाकडून ४२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याची टेंडर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली असून, लवकरच या कामाला गती मिळणार आहे.
रेल्वेच्या या निर्णयामुळे परिसरातील औद्योगिक वसाहतींना फायदा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सोलापूर, सुलतानपूर, धाराशिव आदी ठिकाणच्या मालधक्क्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी दिली.
'या' मालधक्क्यासाठी इतका निधी...
पंढरपूर : १४ कोटी
बाळे : ९.५ कोटी
भिगवण : ६.७ कोटी
लातूर : १२.५ कोटी