सोलापूर (Solapur) : प्रवासी, शेतकरी व व्यापारी असा जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी २००८ मध्ये बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा झाली. १५ वर्षांपासून हा प्रकल्प अद्याप भूसंपादनातच अडकला आहे.
वनविभागाची जागा वगळता ५८० हेक्टरचे १२० कोटी रुपये खर्चून तीन टप्प्यात २०१४ पर्यंत भूसंपादन करण्यात आले. मात्र दहा वर्षांपासून हा प्रकल्प जैसे थेच आहे.
भविष्यातील गरज ओळखून सोलापूर शहरातील टेक्सस्टाईल, गारमेंट व्यापारी, शेतकऱ्यांचे उत्पादन आणि नागरिकांना प्रवासी सेवा, असा तिहेरी मध्य साधण्यासाठी ६२५ कोटींचे बोरामणी विमानतळ उभारणीची घोषणा २००८ मध्ये करण्यात आली. त्यानंतर या विमानतळाच्या भूसंपादनासाठी तीन टप्प्यात १२० कोटी रुपये प्राप्त झाले.
या विमानतळासाठी २०१० मध्ये ५८० हेक्टर खासगी जमिनीचे भूसंपादन सुरू झाले. भूसंपादनाची प्रक्रिया तीन टप्प्यात २०१४ पर्यंत सुरू होती. दरम्यान वनविभागाची ३३ हेक्टर जमीन माळढोक अभयारण्यासाठी प्रलंबित राहिली आहे.
याबाबत विमानतळ प्राधिकरणाने वनविभागाला प्रस्ताव दिला. मात्र माळढोकसह या परिसरातील इतर पक्षांचाही वावर असल्याने ही जागा देण्यास वनविभागाने नकार दिला. वनविभागाची जागा संपादित न झाल्याने हा प्रकल्प रखडला आहे.