सोलापूर (Solapur) : सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून समांतर जलवाहिनी टाकली जात असून, त्याचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण होईल. त्यानंतर भीमा नदीतून सोलापूर शहराच्या पिण्यासाठी पाणी सोडायचे बंद होईल. त्यामुळे अंदाजे १२ ते १५ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. ते पाणी शेतीसाठी किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देता येणार आहे.
जुलैपर्यंत उणे पातळीतील उजनी धरण ४ ऑगस्टपूर्वी भरले आणि धरणातून पाणी भीमा नदी, कॅनॉल, उपसा सिंचन योजनांमधून सोडून द्यावे लागले. मागील दोन महिन्यांत धरणातून तब्बल १०६ टीएमसी पाणी सोडून द्यावे लागले आहे.
अजूनही उजनीत दौंडवरून २८०० क्युसेकचा विसर्ग सुरू असून, धरण सध्या १११ टक्के भरले आहे. त्यामुळे आगामी आठ दिवसांत विसर्ग बंद झाल्यावर उजनीचे सगळेच दरवाजे पुढे तीन महिन्यांसाठी बंद केले जाणार आहेत.
उजनी धरणाची सद्य:स्थिती
एकूण पाणीसाठा
१२३.२८ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा
५९.६२ टीएमसी
धरणातील पाण्याची टक्केवारी
१११.२८ टक्के
दौंडवरून येणारा विसर्ग
२८०० क्युसेक
देगाव योजनेतून पहिल्यांदा सुटणार पाणी
दक्षिण सोलापूर व अक्कलकोटमधील अनेक गावांना फायदा होईल अशा देगाव उपसा सिंचन योजनेचा पहिला टप्पा काही दिवसांत पूर्ण होईल. सध्या देगावजवळील रेल्वे ब्रीजवरील काम सुरू असून १५ दिवसांत ते पूर्ण होईल, अशी सद्य:स्थिती आहे. जानेवारी- फेब्रुवारीत सुटणाऱ्या पहिल्या आवर्तनाचे पाणी देगाव उपसा सिंचन योजनेतून पहिल्यांदाच सुटणार आहे. सुरवातीला दक्षिण सोलापुरातील सहा हजार हेक्टरला त्यातून पाणी मिळणार आहे.