शेवगाव (Shevgaon) : शेवगाव शहरामध्ये प्रमुख रस्त्यावर अडव्यातिडव्या लावलेल्या वाहनांमुळे सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शेवगाव पोलिसांतर्फे उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, व्यावसायिक व वाहनचालकांना शिस्त लागत नसल्याने पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांनी वाहनांवर कारवाई करण्याचा बडगा उगारला आहे.
मागील आठवड्यात मंगळवारी (ता. ३) १८ वाहनांवर कारवाई करत १३ हजार दंड करण्यात आला. १७ दिवसांत २१० वाहनांवर कारवाई करत १ लाख ४९ हजार दंड करण्यात आला. शेवगाव शहरामधून जाणाऱ्या नेवासे, पैठण, गेवराई, पाथर्डी, अहमदनगर या प्रमुख राज्यमार्गांवर हजारो लहान मोठी व अवजड वाहने धावत आहेत. शहरामधून जाणारे रस्ते अरुंद असून दुकानांसमोर व रस्त्यावर लहान मोठी वाहने लावल्याने हे रस्ते आणखी अरुंद होऊन वाहनांना जाण्यासाठी रस्ता शिल्लक रहात नाही. त्यामुळे शहरामध्ये दिवसभर वाहतूक कोंडी होत आहे.
क्रांती चौक व आंबेडकर चौकामध्ये अस्ताव्यस्त लावलेली वाहने, फळविक्रेत्यांच्या हातगाड्या, इतर हातगाड्यांमुळे बसस्थानकातून निघणाऱ्या बस, बाहेरून आलेल्या अवजड वाहनांना रस्ताच शिल्लक राहत नसल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अपघाताची संख्याही वाढत आहे.
यावर उपाययोजना करण्यासाठी नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांनी १५ ऑगस्टपासून प्रमुख रस्त्यावर अडव्यातिडव्या लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिस प्रशानाने १७ दिवसांत २१० वाहनांवर कारवाई करत १ लाख ४९ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
मंगळवार (ता. ३) पोलिस निरीक्षक नागरे यांनी नगर, पाथर्डी, नेवासे रस्त्यावर स्वत: फिरून १८ वाहनांवर कारवाई करत १३ हजार दंड केला. या कारवाईमध्ये पोलिस कॉन्स्टेबल भाऊसाहेब खेडकर, पोलिस कॉन्स्टेबल बप्पासाहेब धाकतोडे, पोलिस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ आदींसह कर्मचारी सहभागी झाले.
शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्याधिकारी, राजकीय पदाधिकारी व व्यावसायिकांनी एकत्र येऊन उपाययोजना कराव्यात. याबाबत नगरपरिषदेने शहरामधून येणाऱ्या प्रमुख रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था केल्यास हा प्रश्न सुटू शकतो.
- डॉ. गणेश चेके, माजी अध्यक्ष, रोटरी क्लब, शेवगाव