सातारा (Satara) : सातारा - म्हसवड - लातूर या केंद्रीय महामार्गाच्या येथील माण नदीच्या पुलावर पडलेले आणि छोट्या-मोठ्या अपघातांना रोजच निमंत्रण देणाऱ्या खड्ड्यांच्या डागडुजीस संबंधित ठेकेदाराने प्रारंभ केला आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बऱ्याच ठिकाणी अंतिम टप्प्यात आले असतानाही या जुन्या पुलाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या पाच वर्षांत पूर्ण होऊ शकलेले नाही. त्याचबरोबर या पुलावर पडलेले खोल खड्डे वाहनचालकांच्या अपघातांना रोजच नवे निमंत्रण धाडत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह वाहनचालकही जेरीस आले होते. या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत पाच जणांना आपल्या प्राणास मुकावे लागल्याचा काळा इतिहास या पुलाबरोबर जोडला गेला आहे.
या पार्श्वभूमीवर येथील पुलाच्या कामाचे रुंदीकरण वा डागडुजी चांगल्या स्वरूपात व्हावी, अशी मागणी सातत्याने होत होती; परंतु निद्रिस्त ठेकेदाराकडून त्याकडे दुर्लक्ष होत होते.
म्हसवड येथील श्री सिद्धनाथ देवस्थानची रथ मिरवणूक यात्रा बुधवारी (ता. १३) आहे. या यात्रेस सुमारे चार ते पाच लाख भाविकांची उपस्थिती राहते. त्यामुळे माण नदीवरील पुलाचे अपूर्ण अवस्थेत बंद ठेवलेले काम करणे गरजेचे होते. यासंदर्भात आमदार जयकुमार गोरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती.
यात्रा काळात या पुलावरून लाखो भाविकांची हजारो वाहने येणार असल्यामुळे पुलाचे बांधकाम पूर्ण करावे आणि संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागल्याबद्दल ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नुकत्याच झालेल्या यात्रा नियोजन बैठकीत आमदार गोरे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे केली होती. त्याबरोबरच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचाही इशारा दिला होता.
तात्पुरत्या डागडुजीने संताप
पुलाच्या अपूर्ण अवस्थेत बंद ठेवलेल्या बांधकामावरून यात्रा नियोजन बैठकीत उपस्थित नागरिकांनीही प्रश्न उपस्थित केले होते. या बैठकीनंतर पुलाचे बांधकाम घेतलेल्या संबंधित ठेकेदारांनी येथील कामे सुरू केली आहेत. असे असले तरी हा पूल यात्रेपूर्वी सुरक्षित वाहतुकीसाठी योग्य बनवला जाईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती; परंतु ठेकेदाराने तसे न करता पुलावर पडलेले खोल खड्डे सिमेंट काँक्रिटचे भरून तात्पुरती मलमपट्टी चालवली असल्याचे दिसत आहे. त्याबद्दल नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.