सातारा (Satara) : परिसराला रस्त्यासारख्या पायाभूत सुविधा मिळत नाही, या घटनेच्या निषेधार्थ येथील सामाजिक कार्यकर्ते सनी भिसे या युवकाने रस्त्यावर बसून खड्ड्यातील पाण्याने अंघोळ करून पालिकेचा निषेध करत आंदोलन केले. पालिकेने शाहूनगरमधील रस्त्याकडे तत्काळ लक्ष द्यावे, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी दिला.
सनी भिसे यांचा शाहूनगरातील रस्त्यांसाठी पालिकेकडे वारंवार पाठपुरावा सुरू होता. मात्र, पालिकेकडे ठेकेदाराची यंत्रणा अपुरी असल्यामुळे काम होऊ शकत नसल्याचा खुलासा करण्यात आला होता. त्याचबरोबर अवकाळी पावसाचीही अडचण होती. पालिका वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप भिसे यांनी करत शाहूनगरातील गुरुकृपा कॉलनीतील रस्त्यावर खड्ड्यांमध्ये बसून तेथील पाण्याने अंघोळ केली. या वेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते. साताऱ्यात रस्ते होत नसल्याचा निषेध भिसे यांनी वेगळ्या पद्धतीने केल्याने दिवसभर समाज माध्यमावर या आंदोलनाची चर्चा होती.
शहर पोलिसांनी आंदोलनाची दखल घेत भिसे यांची समजूत काढली. या आंदोलनाची माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाला देण्यात आली. बांधकाम विभागाच्या सूत्रांनी या रस्त्यासाठी सुमारे ९० लाख रुपयांची निविदा काढण्यात आली असून, या रस्त्याचे काम १५ ऑक्टोबरनंतर लगेच सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले. आंदोलनात प्रकाश घुले, प्रसन्न अवसरे, संतोष घुले, पप्पू घोरपडे, नागरिक, महिला सहभागी झाल्या होत्या.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, अनेकांचा अपघात झाला आहे. याबाबत पालिकेकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले. त्यामुळे या आंदोलनाची वेळ आली. दहा दिवसांत या रस्त्याचे काम मार्गी न लावल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- सनी भिसे, शाहूनगर