कोल्हापूर (Kolhapur) : सातारा-कागल (Satara-Kagal) सहापदरीकरणाच्या टेंडरसाठी सहा वर्षानंतर मुहुर्त लागणार आहे. पूर्वीच्या प्रकल्पात सुधारणा करून आता २४ जानेवारीपर्यंत टेंडर (Tender) दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. २५ जानेवारीला हे टेंडर खोलण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
सातारा-कागल सहापदरीकरणाचे काम गेली सहा वर्षे रखडले आहे. केंद्र सरकारच्या परवानग्या मिळून ही १३३ किलोमीटरच्या महामार्गाचे काम सुरू होण्यासाठी टेंडर प्रक्रिया वारंवार लांबणीवर पडली आहे. सात ऑक्टोबर २०२१ला याकामाची टेंडर प्रसिद्ध झाले होते. मात्र कोल्हापुरातील महापुरात राष्ट्रीय महामार्ग सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे त्याची उंची वाढविण्यासह इतर उपाय करण्यासाठी पूर्वीच्या महामार्गाच्या कामात सुधारणा करण्याचा निर्णय झाला.
त्यानुसार सहापदरीकरणात शिरोली ते मार्केट यार्डला जोडणारा ओव्हरब्रीज, तावडे हॉटेल चौक ते सांगली फाटा मार्गावर तेरा बॉक्स कल्व्हर्ट बांधण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण प्रकल्पाचा खर्चही वाढला आहे. पूर्वी ३ हजार ७२० कोटी रुपयांचा खर्च आता चार हजार ४७९ कोटी इतका झाला आहे. यामुळे कोल्हापुरातील प्रवेशद्वारासह इतर त्रुटी दूर होणार आहेत. २५ जानेवारीनंतर या सहापदरीकरणाचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे.