सातारा (Satara) : पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगत राज्यातील शाळांना गणवेश पुरविण्याचा ठेका देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कश्मिरा पवारसह आठ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
कश्मिरा संदीप पवार, गणेश हरिभाऊ गायकवाड, युवराज भीमराव झळके, राधा युवराज झळके, अमित भरत वायदंडे व जाधव दांपत्य (सर्व रा. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील संशयित अनिल भरत वायदंडे हा मृत झालेला आहे. याबाबत सुषमा महेंद्र खामकर (सध्या रा. रावेत, पुणे, मूळ रा. मुंबई) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत हा गुन्हा घडल्याचे खामकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार, संशयितांनी कश्मिरा पवार ही नवी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान यांची सचिव (राष्ट्रीय सल्लागार) असल्याचे सांगितले, तसेच ती पंतप्रधान यांची राष्ट्रीय सल्लागार असल्याचे ओळखपत्रही त्यांनी दाखविले. त्यानंतर त्यांनी त्यांना महाराष्ट्रातील शाळांना गणवेश पुरविण्याचे टेंडर देणार आहे, पैसे देणार आहे, असे आमिष दाखविले.
त्यानंतर त्यांनी खामकर यांच्या नावाने दिलेल्या पाच कोटी रुपयांच्या टेंडरची प्रतही दाखविली. त्यावर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असा शिक्का व राजमुद्राही होती. ही प्रत दिल्यानंतर त्यांनी खामकर यांना इंडियन सप्लाईज या नावाने बँकेत खाते उघडण्यास सांगितले.
त्यावर त्यांनी १४ कोटी ७३ लाख ४० हजार ४८५ रुपयांचा व्यवहार करून फसवणूक केल्याचे खामकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शहर पोलिसांच्या पथकाने सहा जणांना अटक केली आहे.