सांगली (Sangli) : अखेर महापालिका निधीतून येथील राजर्षी शाहू महाराज रस्त्याचे (शंभर फुटी) काम करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने साठ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. पालिका निधीतून हायब्रिड ॲम्युनिटी तत्वावर हे काम होणार आहे. या योजनेअंतर्गत ठेकेदाराला काम पूर्ण होताच साठ टक्के निधी दिला जाईल. उर्वरित निधी पुढील पाच वर्षांत दिली जाणार आहे. शिवाय पूर्ण दहा वर्षांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्या ठेकेदाराचीच असेल. (Sangli Municipal Corporation)
१९७८ च्या विकास आराखड्यात सांगली शहरासाठीचा बायपास रस्ता म्हणून विकसित करण्यात येणार होता. आत्तापर्यंत पूर्ण क्षमतेने या रस्त्याचे काम झालेले नाही. आता ते होईल अशी अपेक्षा आहे. कधीकाळी शहराबाहेरचा असलेला हा रस्ता आता मध्यवर्ती झाला आहे. एका बाजूला भोबे गटार आहे. या गटाराचे काम गेली तीस वर्षे सुरू आहे. या रस्त्याच्या उत्तरबाजूला शामरावनगर ते विश्रामबागपर्यंतची सुमारे पस्तीस हजारांवर लोकसंख्या विस्तारली आहे. या परिसरातील सांडपाण्याच्या निचऱ्यापासूनचे प्रश्न कायम आहेत. आता हा संपूर्ण रस्ता वर्दळीचा व अतिक्रमणाच्या विळख्यात आहे.
महापालिकेतील सत्तांतराचे बक्षिस म्हणून तत्कालीन उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी शंभर कोटींचा निधी दिल्यानंतर या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्याचा निर्णय झाला होता. हा रस्ता पूर्ण वापरात आल्यास कोल्हापूरकडून विश्रामबाग मिरजेकडे जाणाऱ्या वाहनांना सोयीचे होणार आहे. त्यामुळे शहरातील ताण कमी होऊ शकतो. पूर्ण डांबरीकरण नसल्याने अतिक्रमणे झाली असून, गॅरेजमधील वाहने, हातगाड्यांचा या रस्त्याला विळखा आहे. पालिकेच्या नव्या प्रस्तावामुळे आता या रस्त्याचे भाग्य उजाडेल अशी अपेक्षा आहे.
आयुक्त नितिन कापडणीस यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक फिरोज पठाण, महिला व बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे-पाटील, लक्ष्मण नवलाई, शाखा अभियंता परमेश्वर हलकुडे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित या प्रस्तावाचे सादरीकरण केले.
असा असेल प्रस्ताव
- एकूण ३.८ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम होणार
- सिग्नल, ट्रॅफिक आयलँड, सीसीटीव्ही कॅमेरे, दुभाजकावर वृक्षारोपन, एलईडी दिवे असतील
- दुतर्फा फूटपाथ, पाण्याच्या निचऱ्यासाठी गटारीची व्यवस्था असेल
- प्रत्येक २०० मीटरवर मोबाईल कंपन्यासह इतर वाहिन्या टाकण्यासाठी भुयारी मार्ग