सांगली (Sangli) : महापालिकेच्यावतीने घन कचरा व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी करण्यात येणार असून, मात्र त्यावर चालक पुरवण्यासाठी मात्र ठेकेदार नियुक्त करण्यात येणार आहे. नऊ वर्षांसाठी ८८ चालक पुरवण्यासाठी एकूण १४.९० कोटींचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. घराघरातून कचरा संकलन करण्यासाठी सुसज्ज वाहन व्यवस्था कायमस्वरुपी गरजेची असताना प्रशासनाने इथे मानधनावर कर्मचारी नियुक्त करण्याऐवजी चालक पुरवठ्याचे कंत्राट द्यायचा निर्णय का घेतला याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.
यापुर्वी घंटागाड्या ठेकेदारी तत्वावर चालवण्याचे प्रयोग झाले आहेत. महापालिकेतील काही कारभारी नगरसेवकांनीच हे ठेके घेऊन केवळ कागदोपत्री कामगार नेमून महापालिकेची लुट केली होती. त्यानंतर ते ठेके रद्द करून मानधनावरील कर्मचारी नियुक्त करून घरा घरातून कचरा उचलण्यात प्रारंभ झाला. आता पालिका क्षेत्रातील संपूर्ण कचरा उठावासाठी सुसज्ज यंत्रणा उभी करण्यासाठी विविध प्रकारची वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. वाहने व त्यासाठी लागणारी चालक संख्या अशी ऑटो टिप्पर-४८, रिफ्युज कॉम्पॅटर-७, ट्रक टिप्पर-६, डंपर प्लेसर-७, रोड स्वीपर-२, बॅक हो लोडर-२, सक्शन व्हॅन-४, नाला मॅन मशीन-१, ट्रॅक्टर ट्रेलर-४, जेटींग, ग्रॅबिंग ॲन्ड रॉडींग मशिन -२, सेक्शन कम जेटींग-२, व्हिल स्किड स्टियर लोडर-३ अशी एकूण ८८ चालक पुरवण्यासाठचा हा ठेका आहे. त्यासाठी येत्या ४ एप्रिलपर्यंत टेंडर सादर करण्याची मुदत आहे. एकूण १४ कोटी ९० लाख २२ हजार ७२० रुपयांचे हे टेंडर आहे. पहिल्या तीन वर्षाचा अनुभव पाहून ही मुदत पुढे आणखी तीन तीन वर्षांनी वाढवण्यात येणार आहे.
या टेंडर प्रक्रियेत अनेक अटी शर्थींचा समावेश आहे. मुळात नऊ वर्षासाठी असे ठेके देताना भविष्यात अनेक अडचणी तेव्हांचे पगार अशा अनेक बाबी विचारात घ्यायला हव्यात. ठेकेदारांकडून आज घातलेल्या अटी शर्थींचे पालन किती होईल याबद्दलच साशंकता आहे. शहरातील कचरा उचलणे, त्यांचे वर्गीकरण हे कायमस्वरुपी काम आहे. मानधनावर कामगार नियुक्त करून त्यांची वाहनांसह एक सक्षम व्यवस्था उभी करणे गरजेचे असताना एखाद्या तात्पुरत्या कामासाठी कामगार नियुक्त करावेत अशा पध्दतीने ही निविदा काढण्यात आली आहे. अशी ठेकेदारी महापालिकेच्या तिजोरीची लुट ठरल्याचे यापुर्वीचे दाखले आहेत. असा ठेका मिळवून महापलिकेत एक कायमस्वरुपी चराऊ कुरण उभे करण्याचा डाव कारभाऱ्यांचा असू शकतो. त्यामुळे या टेंडरप्रक्रियेकडे सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रामाणिक लोकप्रतिनिधीनी बारकाईने पाहण्याची गरज आहे.
‘‘ स्वच्छता हे महापालिकेचे अंगभूत काम आहे. अशी कामे ठेकेदारी तत्वावर द्यायचे कारण नाही. याबाबत मा. न्यायालयाने वेळोवेळी अनेक निकाल दिले आहेत. मानधनावर कामगार नियुक्त करून स्थानिक भूमीपुत्रांना रोजगाराची संधी द्यायला हवी. ठेकेदार नियुक्त करून पुन्हा त्याच्यासाठी टक्केवारीची सोय करणे चुकीचे आहे. ठेक्याऐवजी मानधनावरच चालक नियुक्त करावेत.’’
- विजय तांबडे, सरचिटणीस, महापालिका कामगार संघटना