सातारा (Satara) : साताऱ्यातील गुरुवार पेठेत शौचालय आणि पार्किंग तळ विकसित करण्याच्या कामाचा कार्यादेश देवूनही ठेकेदाराने ते काम गेली तीन वर्षे केलेले नाही. हे काम अपूर्ण असल्याने त्याठिकाणी नागरीकांची गैरसोय होत आहे. कार्यादेश घेवूनही काम न करणाऱ्या ओमकार दत्तात्रय भंडारे या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी सातारा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पालिकेकडे केली आहे.
साताऱ्याच्या गुरुवार पेठेतील नागरीकांच्या मागणीनुसार शौचालय आणि पार्किंग तळ विकसित करण्याचा निर्णय सातारा पालिकेने घेतला होता. यानुसार त्या कामासाठी पालिकेने ५५ लाख ७ हजार ८५० रुपये खर्चाची टेडर प्रक्रिया २०१८ मध्ये राबवली. या प्रक्रियेत साताऱ्यातील ओमकार भंडारे या ठेकेदाराने सहभाग घेतला होता. प्रक्रियेदरम्यान भंडारे यांची ४.९० टक्के जास्त दराचे टेंडर पालिकेने मंजूर केले. यानंतर इतर तांत्रिक प्रक्रिया पालिका प्रशासनाने पूर्ण केल्या. यानंतर पालिकेने १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये त्या कामाचा कार्यादेश भंडारे यांना देण्यात आला. कार्यादेश देत असतानाच हे काम १२ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याची अट भंडारे यांना पालिकेने घातली होती.
कार्यादेश घेवून तीन वर्षे पूर्ण झाली तरी सदर काम भंडारे यांनी केले नसल्याने गुरुवार पेठेतील नागरीकांची गैरसोय होत होती. याबाबतच्या तक्रारी झाल्यानंतर सातारा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी त्याची माहिती मागवली. मिळालेल्या माहितीनुसार पालिकेने दिलेल्या कार्यादेशाचा, तसेच घातलेल्या अटींचा भंडारे यांच्याकडून भंग झाल्याचे समोर आले. यामुळे मोरे यांनी पालिकेस निवेदन दिले आहे. यात त्यांनी भंडारे यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.
याच निवेदनात मोरे यांनी यापुढील काळात भंडारे यांना कोणत्याही कामाचे कार्यादेश, कामाचे आदेश देण्यात येवू नयेत, तसेच त्यांची अनामत रक्कम जप्त करण्याची मागणीही केली आहे.
ओमकार भंडारे यांनी पालिकेच्या कार्यादेशाचा भंग केला आहे. या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी निवेदनाद्वारे पालिकेकडे केली आहे. ठेकेदारावर कारवाई झाली नाही तर पालिकेच्या विरोधात आंदोलन केले जाईल.
- सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ते,सातारा