बारामती (Baramati) : येथून पुण्याला (Baramati To Pune) सासवड-दिवेघाट-फुरसुंगी मार्गे जाणाऱ्या वाहनचालकांना दिवेघाटापासूनच खड्डे (Potholes) चुकविण्याची कसरत करावी लागत आहे.
बारामतीहून पुण्याला दैनंदिन कामकाजासाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. बारामती-मोरगाव ते जेजुरीपर्यंतचा रस्ता व्यवस्थित आहे. जेजुरी-सासवड ते दिवेघाटापर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम सुरू असल्याने व अनेक ठिकाणी डायव्हर्जन दिलेले असल्याने पावसाने मोठे खड्डे पडलेले आहेत. दिवेघाटातही अनेक वळणांवर सततच्या पावसाने खड्डे पडलेले आहेत.
दिवेघाट उतरल्यानंतर स्वारगेटपर्यंत जाण्यास किमान दीड तासांचा कालावधी लागतो. फुरसुंगी उड्डाणपुलाच्या अलीकडे व पलिकडे प्रचंड खड्डे पडलेले असून येथे खड्डे चुकविताना वाहनचालकांची कसरत होते. वाहतुकीचा वेगही मंदावत असल्याने बारामती ते पुणे या शंभर किलोमीटर अंतरासाठी तीन तासांहून अधिकचा वेळ लागत आहे.
फुरसुंगी परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी येत असून इतके मोठे खड्डे झालेले आहेत की, त्यात गाड्या अडकतात. बारामती ते पाटस तेथून पुढे सोलापूर-पुणे महामार्गावर टोल भरावा लागत असल्याने बहुसंख्य लोक हा रस्ता टाळतात. दिवेघाटापासून स्वारगेटपर्यंत जाणे दिव्य बनले. प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्तीची वाहनचालकांची मागणी आहे.