बारामती (Baramati) : प्रस्तावित बारामती फलटण रेल्वे मार्गाच्या भूसंपादनापैकी ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित भूसंपादनाचे काम लवकरच संपविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
या रेल्वेमार्गासाठी खासगी जागा संपादित करण्याची जबाबादारी बारामतीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर सोपविली होती. यासाठी एकूण १७७ हेक्टर खासगी क्षेत्र संपादित करायचे होते. त्या पैकी आजवर १३९ हेक्टर क्षेत्राचे संपादन पूर्ण झाले असून उर्वरित ३८ हेक्टर क्षेत्रासाठी निवाडे करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या मध्ये १२ गावांपैकी आठ गावांचे निवाडे नगररचना विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले असून येत्या दोन तीन दिवसात त्याला मंजुरी मिळणार आहे. चार गावांचे निवाडे येत्या आठवडाभरात पूर्ण करून तेही मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. या रेल्वेमार्गासाठीचे भूसंपादन येत्या महिन्याभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनीही तातडीने हे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, असे नावडकर यांनी सांगितले.
रेल्वे मार्गासाठी खासगी जमिनीखेरीज शासकीय एक तर वन विभागाची आठ हेक्टर जागा संपादित करायची असून रेल्वे विभाग हे संपादन करणार आहे. खासगी जमिनीच्या संपादनासाठी आता सक्तीने भूसंपादन केले जाणार आहे. यामध्ये काही खातेदार स्वखुशीने जमीन देण्यासाठी पुढे आलेले असून त्या बाबतची प्रक्रिया सुरू आहे. या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी रेल्वेकडून २३८ कोटी रुपये प्राप्त झाले, त्या पैकी २०५ कोटी रुपयांचे वाटप जमीन मालकांना करण्यात आले आहे.
दृष्टीक्षेपात......
-एकूण १७७ हेक्टर खासगी क्षेत्रापैकी १३९ हेक्टर संपादन पूर्ण
-१२ गावांपैकी ८ गावांचे निवाडे मंजूर होणार उर्वरित चार गावांचे निवाडे आठवड्यात होणार
-आतापर्यंत भूसंपादनासाठी २०५ कोटींचे लाभार्थ्यांना वाटप
- महिन्याभरात प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न
या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे काम वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दैनंदिन या कामाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख घेत आहेत. महिनाभरात हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे.
- वैभव नावडकर, उपविभागीय अधिकारी, बारामती