सोलापूर (Solapur) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे गुरुवारी (ता. २६) उद्घाटन होत आहे. तर नोव्हेंबरपासून सोलापूरहून विमानसेवेचे 'उडान' होणार आहे. फ्लाय ९१ ही कंपनी 'उडान' अंतर्गत सोलापूर- मुंबई विमानसेवा देणार आहे. तर देशांतर्गत विमानसेवेत सोलापूरहून पुणे, तिरुपती, गोवा, बेंगळुरू आदी सेक्टरचा विचार सुरु आहे. सोलापूरहून चार सेक्टरमध्ये विमानसेवेचा विचार झाला आहे, ती सेवा 'ले ओव्हर' अथवा थेट असणार का ? या बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
सोलापूर विमानतळाला आवश्यक असलेली 'बिकास'( (ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटी) व 'डीजीसीए' ची मंजुरी मिळाल्यानंतर आता प्रत्यक्षात विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत विमान कंपन्यांच्या प्रतिनिधी सोबत बैठक झाली. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ कुमार आशीर्वाद, आमदार सचिन कल्याणशेट्टी, यांच्या सह चार विमान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
टेंडर प्रक्रियेला सुरवात :
सोलापूर हुन विमानसेवा सुरु होण्यासाठी तीन ते चार विमान कंपन्या इच्छुक आहेत. विधानसभेची आचार संहिता लागण्यापूर्वी यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.त्यात कोणती कंपनी सोलापूर विमानसेवा देईल यावर शिक्कमोर्तब होणार आहे.मुंबईसाठी सोलापूरहून पहिल्या विमानाचे उड्डाण होणार हे जवळपास निशिचत आहे.
१९९९ रुपयांत मिळू शकते सेवा :
सोलापूर - मुंबई ही विमानसेवा 'उडान' योजने अंतर्गत सुरू होत आहे. फ्लाय ९१ या कंपनीची ही सेवा असण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच या कंपनीने पुण्याहून गोवा व पुण्याहून सिंधुदुर्ग साठी 'उडान' योजनेत सेवा सुरु केलेली आहे. या सेवेचे प्रवासी तिकीट दर हे १९९९ रुपये आहे. त्यामुळे सोलापूरहून उडान योजनेत मुंबईसाठी सेवा सुरू झाल्यास याचेही तिकीट दर १९९९ रुपये इतके राहू शकते.
नोव्हेंबरमध्ये सोलापूरची विमानसेवा सुरु होण्याची शक्यता आहे. विमानसेवेसाठी कंपन्यांची निविदा प्रक्रियेला सुरवात झाली आहे.आचार संहिता लागण्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.
आमदार,सचिन कल्याणशेट्टी.
बैठक सकारात्मक झाली आहे. सोलापूर हुन केवळ मुंबईच नाही तर अन्य शहरांसाठी विमान सेवा सुरु होईल. अन्य शहरांसाठीची सेवा ले ओव्हर असेल की थेट असणार आहे. हे आताच सांगता येणार नाही. हे सर्वस्वी विमान कंपन्यांवर अवलंबून आहे.
- डॉ कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर