सोलापूर (Solapur) : अनेक वर्षांपासून रखडलेल्या जुना पूना नाका ते सात रस्ता व पत्रकार भवन ते जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन या दोन्ही उड्डाणपुलांचे टेंडर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने काढले आहे. या दोन्ही उड्डाणपुलाच्या कामासाठी सुमारे ११०० रुपये खर्च होणार आहेत. उड्डाणपूल कामाच्या अनुषंगाने टेंडर प्रसिद्ध झाले आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला ऑक्टोंबर महिन्यामध्ये सुरवात होणार आहे.
शहरातील दोन्ही उड्डाणपुलाचे काम रखडले होते. शहरातील वाहतुकीचा विचार करता उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे होते. आमदार विजय देशमुख यांनी उड्डाणपुलासाठी केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले आहे. या दोन्ही उड्डाणपुलाच्या कामांचे टेंडर प्रक्रिया प्रसिद्ध झाली आहे. उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी वाढीव ३०० कोटी रुपयांची गरज असताना मात्र महापालिकेच्या नाजूक आर्थिक स्थितीमुळे भुसंपादनास अडथळे येत होते. भुसंपादनासाठीची वाढीव रक्कम राज्य सरकारने देण्याची मागणी आमदार देशमुख यांनी केली होती. त्यानंतर ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
असा आहे खर्च
जुना पूना नाका ते पत्रकार भवन - १२.४९ कोटी
जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन - १०९७.१५ कोटी
एकूण - ११०९.६४ कोटी
शहराच्या विकासासाठी शहरात उड्डाणपूल होणे गरजेचे होते. मी पालकमंत्री असताना या उड्डाणपुलास मान्यता मिळाली होती. प्रशासकीय तांत्रिक अडचणीमुळे कामास विलंब झाला. आता सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.
- विजयकुमार देशमुख, आमदार