लातूर (latur) : गल्लीबोळातील व तासन् तास एकही वाहन न येणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरण झाले. मात्र दररोज हजारोंच्या संख्येने वाहतूक असलेल्या लातूर ते टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. काही दिवसांपूर्वी लातूरपासून थोड्या अंतराचे काम पावसाळा सुरू होताच हाती घेण्यात आले. या कामात लाल मातीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने कंत्राटदार महामार्ग तयार करत आहेत की कुस्तीचा आखाडा, असा प्रश्न वाहनचालक व प्रवासी उपस्थित करत आहेत.
लातूर ते टेंभुर्णी हा सोलापूर - धुळे व सोलापूर - पुणे या दोन राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हा रस्ता असून, त्याच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी चौपदरीकरणाच्या कामाला २०२१ मध्ये मंजुरी दिली, तरी टेंभुर्णीपासून येडशीपर्यंत केवळ दहा मीटर रुंदीचे, तर लातूरपासून येडशीपर्यंत कुठे चौपदरी, तर कुठे सात मीटर रुंदीचे काम करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी साडेपाच मीटर रुंदीचाच रस्ता असून ठिकठिकाणी खड्डेही पडले आहेत. रस्त्याची दुरवस्था झाल्याने लातूरहून पुणे व मुंबईला जाणारी मोठ्या संख्येने वाहतूक सोलापूरमार्गे सुरू आहे. या स्थितीत लातूरपासून विमानतळ चौकापर्यंत चौपदरीकरणाचे काम विभागाने पावसाळा सुरू होताच हाती घेतले असून एका बाजूने हा रस्ता खोदून ठेवून वाहतुकीची कोंडी केली आहे.
‘‘या रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे होत असून कामात मोठ्या प्रमाणात लाल मातीचा वापर करणे सुरू आहे. खोदलेल्या खड्ड्यात पाणी असतानाही त्याचा उपसा न करताच त्यावर लालमाती व दगडाचे थर देऊन दबाई सुरू आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी दिल्ली व मुंबईत सतत बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र अजून त्यावर ठोस निर्णय झाला नाही. या स्थितीत सध्या सुरू असलेले काम तरी दर्जा राखून करावे,’’ अशी मागणी या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी आंदोलन करणारे लक्ष्मीकांत तवले यांनी केली.
महामार्गाच्या कामात वापरली जाणारी ती लाल माती नसून मुरूमच आहे. आपल्या भागात अशा प्रकारचा मुरूम सापडत नाही. खोदताना पहिल्यांदाच तो निघाला आहे. कोकणात अशाच रंगाचा मुरूम आहे. काही अंतरात या मुरूमाचा वापर झाला होता. तो काढून टाकण्यात येत असून तिथे आपल्याकडील मुरूमाचा वापर करण्यात येईल.
- दत्ता वाघ, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, लातूर