सोलापूर (Solapur) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलीन करा, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी तब्बल पाच महिने लढा दिला. विलीनीकरण झाले नाही, पण वेतनवाढ आणि पगाराची शाश्वती कर्मचाऱ्यांना मिळाली. २२ एप्रिलपासून बहुतेक कर्मचारी कामावर हजर झाले असून सध्या ९१ हजार कर्मचारी रुजू झाले आहेत. या संपामुळे 'लालपरी'वरील प्रवाशांचा विश्वास उडाला असून, पुन्हा लालपरी उभारी घेऊ शकणार नाही, असा काहींचा अंदाज होता. पण, पाच महिने जागेवर थांबलेली ‘लालपरी’ २२ एप्रिलनंतर राज्यभर सुसाट धावू लागली आहे. मागील दीड महिन्यांत ५२१ कोटींची कमाई करून खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांचा अजूनही तितकाच विश्वास असल्याचे ‘लालपरी’ने सिद्ध केले आहे.
२२ एप्रिलनंतर सुरवातीला साडेबारा हजार बसगाड्या मार्गांवर धावत होत्या आणि दररोजचे उत्पन्न साडेतेरा कोटींपर्यंत होते. पण, १५ दिवसांची ही स्थिती बदलली आणि दररोज १४ हजार बसगाड्या मार्गांवर धावत असून दररोजचे उत्पन्न १७ कोटींवर पोहचले आहे. १ एप्रिल ते १५ मे या दीड महिन्यांतच लालपरीला ५२१ कोटींचे उत्पन्न मिळाले. कर्मचारीही उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून पगार वेळेत होईल, हा त्यामागील हेतू आहे.
खासगी वाहनांचे दर परवडणारे नसल्याने गावापर्यंत येणाऱ्या लालपरीचाच सर्वसामान्यांना मोठा आधार आहे. मागील १५ दिवसांत प्रवाशांची संख्या वाढल्याने मार्गांवर धावणाऱ्या बसगाड्यांमध्ये सोळाशेंची वाढ झाली आहे. दुसरीकडे या १५ दिवसांतच लालपरीला १३१ कोटींपर्यंत उत्पन्न मिळाले आहे.
‘प्रवासी मित्र’द्वारे उत्पन्नवाढीचा प्रयत्न
पाच महिन्यांच्या संपामुळे घटलेली प्रवाशी संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने ‘प्रवासी मित्र’ ही संकल्पना सुरू केली आहे. राज्यातील बहुतेक गावांपर्यंत पोहचलेली लालपरी खडतर मार्गावर प्रवास करताना आता पुन्हा एकदा सुसाट धावू लागली आहे. प्रवासी वाढावेत म्हणून आता एसटी स्टॅण्डपासून जवळच असलेल्या खासगी वाहनांच्या थांब्याजवळील प्रवाशांना एसटीने जाण्यासंबंधी आवाहन केले जाते. त्याचाही मोठा फायदा होत आहे, अशी माहिती सोलापूरचे विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी दिली.
लालपरीचे उत्पन्न
- दररोजची सरासरी कमाई : १६.८४ कोटी
- मार्गांवरील बस : १३,३६५
- १ ते ३० एप्रिलपर्यंतचे उत्पन्न : १८३ कोटी
- १ ते १५ मेपर्यंतची कमाई : १३१ कोटी