सातारा (Satara) : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा शहरातील सहा विकासकामांसाठी तब्बल सात कोटी २० लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा नियोजन समितीमधून हा निधी उपलब्ध झाला आहे.
या निधीतून पालवी चौक, गोडोली येथील मोरे घरासमोर बॉक्स कल्वर्ट करण्यासाठी ३७ लाख ४६ हजार १८० रुपये, पॅरेंट स्कूल ते पालवी चौक, गोडोली अखेर रस्ता खडीकरण करणे १ कोटी ९९ लाख ८४ हजार १९६ रुपये, पॅरेंट स्कूल ते पालवी चौक, गोडोली येथे बॉक्स कल्वर्ट करण्यासाठी ७० लाख १२ हजार ७५० रुपये, समर्थ मंदिर चौक ते रामाचा गोट ते मनामती चौक येथे रस्ता करण्यासाठी १ कोटी ९४ लाख ५१ हजार २१० रुपये निधी मंजूर झाला आहे.
कातकरी वस्ती येथील ओढ्यास संरक्षक भिंत बांधणेसाठी ९९ लाख ६१ हजार ४०५ रुपये आणि पॅरेंट स्कूल ते पालवी चौक, गोडोलीअखेर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी १ कोटी १८ लाख ९७ हजार ९९९ रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. टेंडर प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून मंजूर कामे वेळेत व दर्जेदार करा, अशी सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.