कोल्हापूर (Kolhapur) : जिल्ह्यातील आदमापूर-लिंगनूर रस्त्याचे (Admapur-Lingnur Road) काम येत्या सात दिवसात सुरु करा. हे काम मुदतीत सुरू न झाल्यास संबंधित कंपनीचा ठेका (Contract) रद्द करून कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये (Balcklist) टाकण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिला.
आदमापुर -लिंगनुर रस्ता कामाची आढावा बैठक मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण जाधव, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आदमापूर ते लिंगनूर मार्गावर चार विविध कारखाने आहेत. नागरिक, कामगार व शेतकरी यांच्यासह ऊस वाहतूकही या मार्गावर होते. या मार्गावर होणारे अपघात व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आदमापूर -लिंगनूर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिल्या. या रस्त्याची प्रलंबित कामे गतीने पूर्ण करावीत. हा रस्ता चांगल्या दर्जाचा करून रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून रस्ता नागरिकांसाठी खुला करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. रस्ता मुदतीत पूर्ण न झाल्यास संबंधित कंपनी मालकावर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी बैठकीत दिला. तसेच रस्त्याच्या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
हा मार्ग अत्यंत खराब झाला असून या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. यामुळे नागरिकांना दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता तात्काळ सुरू करून काम लवकरात लवकर काम पूर्ण करून नागरिकांसाठी रस्ता खुला करावा व वेळेत सुरू न झाल्यास कंपनी मालकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी या भागातील पदाधिकारी व नागरिकांनी केली.