Satara : वर्षभरात मेडिकल कॉलेजचे स्थलांतर तरीही 'कॅन्टीन’साठी कोट्यवधींच्या खर्चाचा घाट

Satara
SataraTendernama
Published on

सातारा (Satara) : मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना अवघ्या एक ते दीड वर्षासाठी जिल्हा रुग्णालयातील जागेत विद्यार्थ्यांसाठी कॅन्टीन व स्वच्छतागृहाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चाचा घाट वैद्यकीय शिक्षण विभागाकडून घातला जात आहे. दोन वर्षांनंतर त्या जागेचे करायचे काय, असा प्रश्‍न निर्माण होणार असताना जिल्हा रुग्णालयातील जागेचा व नागरिकांच्या पैशाचा अपव्यय थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Satara
Mumbai : Good News! मुंबईकरांचा वेळ वाचणार; सव्वा सहा किमीच्या 'त्या' बोगद्याचे...

जिल्हा रुग्णालयाचा होतोय वापर

जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले; परंतु जागेच्या घोळात काम लांबले. त्यामुळे प्रवेश सुरू करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा दाखवून किमान प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाचा संपूर्ण ताबा सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे देण्यात आला.

स्त्री रुग्णालयाच्या इमारतीत वर्ग

हस्तांतरामध्ये जिल्हा रुग्णालयात नव्याने बांधण्यात आलेल्या शंभर बेडच्या स्त्री रुग्णालयाची स्वतंत्र इमारतही मेडिकल कॉलेजला देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचे वैद्यकीय शिक्षणाचे वर्ग भरत आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या स्वतंत्र लॅबची इमारतही जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बांधण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील जागा आधीच व्यापली गेली आहे.

Satara
Satara : सातारा, सांगली अन् मिरजकरांना रेल्वेकडून नव्या गाडीचे Gift!

वर्षभरात इमारत ताब्यात

अनेक राजकीय नाट्यानंतर साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न मंजूर झाल्यानंतर पाच वर्षांनी मार्गी लागला. त्यानंतरही टेंडर घेण्यासाठीही अनेक घडामोडी घडल्या. अनेक वर्षांनंतर मेडिकल कॉलेजच्या कामाला मुहूर्त सापडला. सध्या हे काम वेगात सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या होस्टेलच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नव्या इमारतीमध्ये राहण्यासाठी शिफ्ट करण्यात आले आहे. उरलेल्या इमारतींचे कामही प्रगतिपथावर आहे. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या इमारती एक ते दीड वर्षात मेडिकल कॉलेजच्या ताब्यात मिळणार आहेत.

कोट्यवधींचा खर्च

जिल्हा रुग्णालयाच्या हस्तांतरानंतर मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया गेली दोन वर्ष सुरू झाली. यंदा तिसऱ्यांदा प्रवेश प्रक्रिया होईल. म्हणजेच गेली दोन वर्षे आहे त्या परिस्थितीत, उपलब्ध जागा व साधन सुविधांमध्ये मेडिकल कॉलेजचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांनीही त्या पद्धतीने समजून घेतले. पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेपर्यंत मेडिकल कॉलेजचे बहुतांश काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे महाविद्यालय नव्या इमारतीत सुरू केले जाऊ शकते. असे असताना जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नवीन कॅन्टीन व स्वच्छतागृहाचे काम वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजूर केले आहे. याचे टेंडर निघून काम पूर्ण होईपर्यंत या वर्षातील निम्यापेक्षा जास्त काळ जाणार आहे. त्यामुळे उरलेल्या कालावधीसाठी एवढा खर्च करायचा का याचा विचार हे काम मंजूर करणाऱ्यांनी करायला हवा होता. त्यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय टाळून हा पैसा एखाद्या चांगल्या व कायमस्वरूपीच्या कामासाठी होऊ शकतो.

सर्वकष प्लॅनिंग आवश्यक

जिल्हा रुग्णालयामध्ये आधीच मर्यादित जागा आहे. तेथे रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या नवनवीन सुविधा निर्माण करण्यासाठी जागेचा वापर झाला पाहिजे. मुळात आयुष्य रुग्णालयासाठी आवश्यक असलेली जागा जिल्हा प्रशासन उपलब्ध करू शकलेले नाही. त्यातच औषधांचा साठा करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील जागा निवडण्यात आली. त्यामुळे एखादे नवीन युनिट सुरू करण्याबाबत जिल्हा रुग्णालयात जागा मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात आवश्यक असणाऱ्या इमारतींचा रेखांकन आराखडा तयार करणे आवश्यक आहे. विनाकारण पैशाबरोबर जागा अडकवून ठेवण्याचे प्रकार जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींकडून रोखले जाणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com