कोल्हापूर (Kolhapur) : छतावरील (रुफ टाॅप) सौर ऊर्जा योजनेसाठी पात्र संस्थांची नियुक्ती करण्यासाठी महावितरणतर्फे (Mahavitran) ई-टेंडर (E Tender) प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र शासनाकडून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा (Solar Energy) निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी वित्तसाह्य देण्यात येत आहे. यात घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के, ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
तसेच सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकरी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान दिले जाईल. यंत्रणेला महावितरणकडून लावण्यात आलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर सर्वच वर्गवारीतील ग्राहकांकडून शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जात आहे. त्याचाही आर्थिक फायदा संबंधित घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना होणार आहे.
योजनेच्या पहिल्या टप्प्यात ग्राहकांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे २०२१-२२ वर्षासाठी आणखी ५० मेगावॅटचे उदिद्ष्ट निर्धारितकरण्यात आले आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी पात्र संस्थांची नियुक्ती करण्यासाठी महावितरणने नुकतीच ई-निवीदा प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सौर ऊर्जा धोरणाला अनुसरून महावितरणकडून छतावरील सौर ऊर्जाप्रकल्पांना आणखी वेग देण्याचा प्रयत्न आहे.
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा
मंत्रालयाच्या योजनेतून घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मितीयंत्रणा बसविण्यासाठी ४० टक्क्यांपर्यंत अनुदानाद्वारे प्रोत्साहन देण्यात येत आहे. आतापर्यंत महावितरणकडून (कंसात मेगावॅट) ३० हजार ९९९ घरगुती (१८५), २४५७ औद्योगिक (३५९), ७८७१ वाणिज्यिक (१४७), ३२०६ सार्वजनिक सेवा (११०) आणि ११० इतर (१०) ग्राहकांकडील छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मितीची वीज घेण्यात येत आहे.