चिपळूण (Chiplun) : कोयना प्रकल्पाची सुरक्षा आतापर्यंत महानिर्मिती कंपनीने स्वतःच्या यंत्रणेद्वारे अबाधित ठेवली आहे; मात्र आता प्रकल्पाची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपवण्याची लगीनघाई सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सुरक्षेचा खर्च १५ कोटींवरून सुमारे ८५ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा खर्च सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून वीज बिलामार्फत वसूल केला जाणार आहे.
महाराष्ट्राची भाग्यरेखा ठरलेल्या या प्रकल्पातून १६ मे १९६२ पासून वीजनिर्मिती सुरू झाली. पाण्यावर निर्माण होणारी सर्वात स्वस्त वीज म्हणून या प्रकल्पाची देशभरात ख्याती आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी चारही टप्प्यांतून एकूण २ हजार ९५८ मेगावॉट वीजनिर्मिती केली जाऊ शकते. प्रकल्पात २०२१-२२ मध्ये रेकॉर्ड ब्रेक ३ हजार ८६८ मेगावॉट वीजनिर्मिती झाली आहे. सह्याद्रीतील डोंगरांच्या खाली कोयना प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. कोयना धरण आणि पोफळीचे वीजनिर्मिती केंद्र सुरक्षेच्या कारणास्तव लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे नेहमीच चर्चेत असते.
प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर २४ तास महानिर्मिती कंपनीची कडेकोट सुरक्षा असते. त्यासाठी कंपनी दरवर्षी १५ कोटी रुपये खर्च करत होती; मात्र गेल्या काही काळापासून प्रकल्पाची सुरक्षा वेगवेगळ्या यंत्रणांकडे सोपवण्याचा घाट घातला जात आहे. सध्या येथील सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपवण्याची लगीनघाई सुरू आहे. सर्व प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होऊन लवकरच या ठिकाणी सीआयएसएफचे जवान तैनात झालेले दिसणार आहेत. प्रकल्पाच्या सुरक्षेच्यादृष्टीने सीआयएसएफने सुचवलेल्या सुरक्षाविषयक सर्व बाबींची पूर्तता केली जात आहे. सुरक्षासाधने, मनुष्यबळ आदी बाबी पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्यासाठी वनटाइम सुमारे ६० कोटींचा खर्च येणार आहे. हा खर्च महानिर्मितीच्या तिजोरीतून होणार आहे. त्याशिवाय प्रत्येक वर्षी सीआयएसएफच्या जवानांचे वेतन आणि इतर बाबींवर सुमारे २५ कोटींचा खर्च करावा लागणार आहे. हा बोजाही महानिर्मितीलाच सोसावा लागणार आहे.
अतिरेकी कारवायांचा धोका
कोयना प्रकल्प पाहण्यासाठी पूर्वी पर्यटकांना प्रवेश दिला जात होता; मात्र काही वर्षांपूर्वी मुंबई येथे एका अतिरेक्याकडे कोयना धरणाचा नकाशा सापडला. त्यानंतर कोयनेतील बोटिंग बंद करण्यात आले. प्रकल्प पाहण्यासाठी येणाऱ्यांची सर्व माहिती घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार पर्यटकांना प्रवेश दिला जात होता; मात्र देशात अतिरेकी कारवाया वाढल्यामुळे कोयना प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोयना प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलिसदलाचे जवान आणि महानिर्मितीची यंत्रणा कार्यरत आहे. या यंत्रणेद्वारे आम्ही प्रकल्पाच्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले आहे; मात्र राज्य सरकारच्या गृह विभागाने सीआयएसएफची सुरक्षा यंत्रणा घेण्याबाबत शिफारस केली आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर सीआयएसएफची यंत्रणा घेण्याबाबत निर्णय झाला आहे.
- संजय चोपडे, मुख्य अभियंता, ‘महाजनको,’ पोफळी